भल्याभल्यांना जमलं नाही ते 108 वर्षांच्या आजीबाईंनी करून दाखवलं

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील 108 वर्षांच्या एका आजीबाईंनी धैर्याने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सावित्रीबाई तुकाराम निर्मळ असं या आजीबाईंचं नाव असून त्या खेड तालुक्यातील मुसाड गावच्या त्या रहिवासी आहेत. ज्या ठिकाणी भल्याभल्यांनी कोरोनासमोर हात टेकले त्याच कोरोनाला या आज्जी बाईंनी सहज हरवलं. 
 

कोरोनाला आपण हरवू शकतो हे दाखवून दिलंय, खेड तालुक्यातील मुसाड गावातील 108 वर्षाच्या सावित्रीबाई तुकाराम निर्मळ या आजीबाईंनी. सावित्रीबाई निर्मळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 26 मे ते 8 जून पर्यंत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पहिले दोन दिवस त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. दरम्यान 8 जूनला त्यांना सावित्रीबाई यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. दरम्यान आपल्याला लवकर बरं होऊन घरी परतण्याची ओढ होती, त्यामुळेच देवाने आपल्याला सुखरुप घरी आणले अशी प्रतिक्रिया सावित्रीबाई निर्मळ यांनी दिली आहे. योग्य उपचाराबरोबरच मानसिक सामर्थ्य आणि धैर्याच्या बळावर कोरोनासारख्या आजारालाही सहज पराभूत करता येतं, याचं प्रेरणादायी उदाहरण या 108 वर्षांच्या आजीबाईंनी सर्वांसमोर ठेवलं आहे.