खेड:- तालुक्यातील भरणे येथील सद्गुरु रेसिडेन्सी इमारतीतील फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्याने २ लाख ९४ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २६ रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
भरणे येथील सद्गुरु रेसिडेन्सी बी विंग रुम नं. २०६ मध्ये वास्तव्यास असलेले फिर्यादी यांच्या फ्लॅटचा मुख्य लोखंडी सेफ्टी दरवाजा तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे घराचा लाकडी दरवाजा धारदार हत्याराने तोडत ‘घरात प्रवेश केला. त्यानंतर २ लाख ९४ हजार रुपये किंमतीच्या ‘दागिन्यांवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. चोरीचा हा प्रकार निदर्शनास येताच फिर्यादीने पोलीस ठाणे गाठले.
चोरट्यांचे पोलिसांना आव्हान
गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व संकुलातील सहा फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न झाला होता. एका फ्लॅटमधून ३ हजार रुपये चोरट्याने लंपास केले होते. चोरट्यांनी आता भरणे येथे मोर्चा वळवला आहे. ३ लाखांच्या दागिने चोरी प्रकरणाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घरफोड्यांची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.