बोलेरो- ॲक्टिवा अपघातात रत्नागिरीतील पोलिसाचा मृत्यू

महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी; दोघेही रत्नागिरी पोलीस मुख्यालयात कार्यरत

रत्नागिरी:- बोलेरो टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला आहे. कृष्णा मनोहर ठोंबरे (वय २५ रा. जरी बोडका ता. खुलताबाद जि. संभाजीनगर) असे मयत पोलीस तरुणाचे नाव आहे. तर महिला पोलीस कर्मचारी आरती अमर चौगुले (वय २१ रा. बिद्री कागल) ही गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी ७.३० वाजता तिरवडे तर्फ खारेपाटण या ठिकाणी घडली. टेम्पो चालक कादर उमर पाटणकर (वय ४८ या. कातळी ता. गगनबावडा) याच्यावर वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत पोलीस कृष्णा ठोंबरे व महिला पोलीस आरती चौगुले हे रत्नागिरी पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. आरती चौगुले यांच्या बिद्री येथील घरी कार्यक्रम असल्याने दुचाकी वरुन मयत कृष्णा व आरती जात होते. रविवारी पहाटे ५ वा. दोघेजण रत्नागिरी येथून निघाले. राजापूर, खारेपाटण, भुईबावडा ते गगनबावडा या मार्गे ते प्रवास करत होते. दरम्यान भुईबावडा परिसरात दाट धुके होते.

गगनबावडाहून उंबर्डेच्या दिशेने भाजी भरलेला टेम्पो (क्र. एम एच ०९- इएम ४६०१) चालक कादर उमर पाटणकर घेऊन येत होता. तर पोलीस कृष्णा आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एम एच ०९ जी आर. ९९०५) घेऊन गगणबावड्याच्या दिशेने जात होते. तिरवडे तर्फ खारेपाटण नजीक दाट धुक्यात दोन्ही वाहनांचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार कृष्णा ठोंबरे रस्त्यावर आदळला. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले.

या घटनेची माहिती मिळताच वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधुरी अडुळकर, हवालदार आर. बी. पाटील, राहुल तळसकर, अजय बिल्पे, राजू शेळके, भागिरथ मोहळे, पुंडलिक वानोळे हरिश्चंद्र जायभाय घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस व स्थानिकांनी जखमी महिला पोलीस आरती चौगुले यांना उपचारासाठी वैभववाडी रुग्णालयात दाखल केले. तर मयत कृष्णा ठोंबरे यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. दरम्यान रत्नागिरी पोलीस मुख्यालयचे राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळशिंगे व इतर पोलीस कर्मचारी यांनी वैभववाडीत धाव घेतली. वैभववाडी पोलीस ठाण्यात टेम्पो चालक कादर पाटणकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

मयत पोलीस कृष्णा ठोंबरे हा तरुण २०२३ मध्ये रत्नागिरी पोलीस दलात भरती झाला होता. त्यांच्या अपघाती मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. कृष्णा ठोंबरे यांच्या पश्चात आई वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे.