बोट दुर्घटना प्रकरण; मच्छीमार समुद्रात चक्का जाम आंदोलन छेडणार

रत्नागिरी:- जयगड येथील बेपत्ता मच्छीमारी नौकेचा शोध अजुनही सुरुच आहे. माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने नवेद 2 नौका बुडाल्याचा मच्छीमारांचा अंदाज असून या प्रकरणी योग्य तो निर्णय झाला नाही तर समुद्रात चक्का जाम आंदोलन करु असा आक्रमक पवित्रा मच्छीमारांनी घेतला आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. 6) साखरीआगार येथे मच्छीमारांची बैठक झाली.

साखरीआगार येथील एका मंदिरात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुहागर तालुक्यातील पालशेत, साखरी आगर, रत्नागिरी तालुक्यातील जयगड, वरवडेसह आजूबाजूच्या परिसरातील सुमारे दोनशेहून अधिक मच्छीमार एकवटले होते. यावेळी नवेद बोटीचे मालक नासीर हुसेनमिया संसारे यांच्यासह मच्छीमार सोसायटीचे पदाधिकारीही उपस्थित होते. जयगडमधील नवेद 2 मच्छीमारी नौकेचा अपघात हा मालवाहतुक करणार्‍या जहाजाने झाला असावा असा संशय एका तक्रारीद्वारे बोटीचे मालक नासीर यांनी जयगड पोलिसांकडे केला आहे. या प्रकारणी पोलिसांचा तपास सुरु असला तरीही प्रशासनाकडून कोणतीच भुमिका घेतलेली नाही. त्यामुळे स्थानिक मच्छीमार आक्रमक झाले आहेत. ती मच्छीमारी नौका कशी गायब झाली, याबाबत सखोल तपासाची मागणी मच्छीमारांकडून होत आहे. त्यावर चार खलाशी आणि दोन तांडेल होते. एका खलाशाचा मृतदेह सापडला असून बावीस वावात बेपत्ता नौकेवरील मच्छी साठवण्याचा टब एवढ्याच वस्तू मिळाल्या आहेत.

आठ दिवसांहून अधिक काळ झाला आहे. बेपत्ता नौकेवरील खलाशांची माहितीही मिळत नाही. नवेद नौका बेपत्ता झाल्यानंतरच्या कालावधीत मालवाहू जहाज प्रवास करत असल्यास त्याचा तपास होणे आवश्यक आहे. या परिसरातून अनेक मच्छीमारी नौका फिरत असतात. मालवाहू नौका जा-ये करत असताना त्याची माहिती आजूबाजूच्या मच्छीमारांना वेळेत देणे आवश्यक असून त्याची प्रशासनाने दखल घेतली पाहीजे. तसे होत नसेल भविष्यात अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता मच्छीमारांना आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी गुहागर, जयगड येथील मच्छीमार मालवाहू नौका जाणार्‍या चॅनेलवर मच्छीमारी नौका ठेवून समुद्रात चक्का जाम करण्याची तयारी केली आहे.