जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश
रत्नागिरी:- बांग्लादेशी नागरिकाला रत्नागिरीत जन्मदाखला दिल्याप्रकरणी आता ग्रामसेवकासह तत्कालिन सरपंच आणि कर्मचार्यांची चौकशी होणार असून तात्काळ हा चौकशी अहवाल सादर करा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी दिले आहेत. याच ग्रामसेवकाकडून अशाप्रकारे अनेक दाखले दिले गेले असल्याची माहिती पुढे आल्याने त्याबाबतदेखील आता कसून चौकशी होणार आहे.
शहरालगतच्या शिरगांव ग्रामपंचायत येथून बांग्लादेशी नागरिकाला जन्मदाखल दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई येथे या बांग्लादेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रावरून ही बाब समोर आली. दरम्यान याप्रकरणी जन्मदाखला देणार्या तात्कालीन शिरगांव सरपंच व ग्रामसेवक यांना मुंबई येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.
मोहम्मद इद्रीस इसाक शेख असे मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी नागरिकाचे नाव आहे. मुंबई पोलिसांकडून शेख याला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याजवळ शिरगांव ग्रामपंचायत येथील जन्मदाखला असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार त्याच्या जन्मदाखल्यावर पत्ता जन्म १ मे १९८३ रोजी उद्यमनगर पडवेकर कॉलनी, ता. जि रत्नागिरी असा आहे. तसेच आईचे नाव शाहिदा बेगम मोहम्मद इसाक शेख व वडिलांचे नाव मोहम्मद इसाक शेख असे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासामध्ये शेख याने खोटा जन्मदाखला तयार केल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.
शहरालगतच्या शिरगाव ग्रामपंचायतीतून अशाप्रकारे बोगस दाखला एका बांग्लादेशी व्यक्तीला दिला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकार्यांसह मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी घेतली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई सीआयडी करत असून दिलेल्या दाखल्याची पडताळणी केली असता हा दाखला खोटा असल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशीत समोर आले आहे.
तत्कालिन ग्रामसेवक यांची पदोन्नती होऊन ते दापोली येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या काळात असे अनेक बोगस दाखले वितरित झाल्याची माहिती आता पुढे येऊ लागली आहे. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी गटविकास अधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.