बेपत्ता प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी:- घरातून निघून गेलेल्या शहरानजीकच्या भाटीमिऱ्या येथील प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी १८ जून रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. संतोष विजय लाड ( वय ४५, रा. भाटीमिया, रत्नागिरी ) असे गळफास घेतलेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्याचा चुलत भाऊ विक्रम सुभाष लाड याने शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली . त्यानुसार संतोष शनिवारी ( १७ जून ) रात्री घरातून निघून गेला होता . त्याचे नातेवाईक त्याचा सर्वत्र शोध घेत असताना रविवारी सकाळी भाटीमिया येथील म्हसोबा मंदिराजवळील झाडाला संतोष नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. भावाने आत्महत्या केल्याचे बघताच विक्रम याला धक्काच बसला. याबाबत संतोषचा चुलत भाऊ विक्रम लाडने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. शहर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . तो घरातून का बाहेर पडला होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. संतोष याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले , याचा तपास आता पोलिस करीत आहेत.