राजापूर:- लाकडे तोडू नका मालक आम्हाला विचारतात असे म्हटल्याचा राग आल्याने 5 जणांनी बेकायदेशीर जमाव करुन तरुणाला मारहाण केल्याची घटना राजापुरातील हातिवले आदर्शनगर येथे घडली.
याप्रकरणी परेश विलास मांजरेकर (29, हातिवले, आदर्शनगर, राजापूर) याने राजापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत कदम, जितू कदम, संकेत कदमची आई, संकेत कदमची बायको, जितू कदमची बायको (सर्व रा. हातिवले, आदर्शनगर, राजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही घटना 10 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परेश मांजरेकर आणि कदम कुटुंब यांच्यात जमिनीवरुन वाद आहेत. संशयित 5 जण हे धावलकर यांच्या जागेतील लाकडे तोडत होते. यावेळी परेश याच्या वडिलांनी ‘लाकडे तोडू नका मालक आम्हाला विचारतात‘ असे सांगितले. याचा राग आल्याने परेशच्या वडिलांना शिवीगाळ केली व गैरकायदा जमाव करुन परेश मांजरेकर हा किराणा मालाच्या दुकानात असताना पाचजणांनी हाताच्या ठोशाने, थापटाने मारहाण करुन शिवीगाळ केली. यावेळी हे भांडण सोडवण्यासाठी परेशची आई आणि बहीण आली असता शिवीगाळ केली. याप्रकरणी परेश याने राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजापूर पोलीसांनी 5 जणांवर भादविकलम 143, 147, 451, 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.