रत्नागिरी:- रत्नागिरीतील पर्ससीन नेट मच्छिमारांवरील बेकायदेशीर कारवाई विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय पर्ससीन नेट मच्छिमार रत्नागिरी तालुका असोसिएशनने घेतला आहे. 12 एप्रिल रोजी लाक्षणिक उपोषण करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. उपविभागीय अधिकार्यांकडे यासंदर्भात अर्ज देण्यात आला आहे.
पर्ससीन नेट मासेमारी 1 जानेवारीपासून केंद्र शासनाच्या अखत्यारितील समुद्रात म्हणजे 12 नॉटिकल मैल बाहेर केली जात आहे. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाकडून मिरकरवाडा बंदरावर कारवाई केली जात आहे. केंद्राच्या 12 नॉटिकल मैल बाहेरून मासेमारी करून आल्यानंतर पर्ससीन नेट नौकाना राज्याच्या समुद्र मार्गातूनच मिरकरवाडा बंदरात यावे लागते. अशावेळी 12 नॉटिकल मैलच्या आत समुद्रात मासेमारी केल्याचा ठपका ठेवून कारवाई केली जात आहे.
केंद्राच्या अखत्यारितील समुद्रातून मासेमारी करून येणार्या नौकाना मासळी उतरवण्यासाठी मिरकरवाडा बंदरात येण्याची अनुमती आहे. तरीही बेकायदेशीररित्या कारवाई केली जात असल्याचा आरोप पर्ससीन नेट मच्छिमारांकडून केला जात आहे. ही बेकायदेशीर कारवाई थांबवली जावी, यासाठी येत्या सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर हे आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी, म्हणून उपविभागीय अधिकार्यांकडे निवेदन देण्यात आले आहे.