खेड:- तालुक्यातील सवेणी येथे भारत संचार निगम लिमिटेड या सरकारी कंपनीने उभारलेल्या मोबाईल टॉवरच्या सुमारे १ लाख ५७ हजार ३६८ रुपये किमतीच्या ४६ बॅटऱ्यांची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी येथील पोलिस स्थानकात प्रभारी अधिकारी प्रमोद पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या पूर्वी घडली आहे. खेड येथील उपविभागीय अभियंता संजय पांडुरंग तिडके हे रजेवर असल्याने २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर यादरम्यान खेड कार्यालयाचा पदभार फिर्यादी प्रमोद पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे सवेणी येथील बीएसएनएल कंपनीचा टॉवर उभारण्यात आला असून, या टॉवरच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञाताने इमारतीमध्ये प्रवेश करून सुमारे १ लाख ५७ हजार ३६८ रुपये किमतीच्या ४६ बॅटऱ्या चोरल्या. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.