बीएसएनएलची धुरा अवघ्या 8 जणांवर

80 टक्के निवृत्त ; आता 4 जी सेवा सुरू होणे धुसर

रत्नागिरी:-भारत दूरसंचार निगम लि. (बीएसएनएल) कंपनीच्या प्रधान कार्यालयाची धुरा अवघ्या 8 कर्मचार्‍यांवर आहे. एकेकाळी 125 कर्मचार्‍यांना भार न पेलण्याची परिस्थिती होती. मात्र आर्थिक अडचणी आणि 80 टक्के कर्मचार्‍यांनी घेतलेली स्वेच्छा निवृत्ती यामुळे मोजकेच अधिकारी, कर्मचारी बीएसएनएलची जबाबदारी पेलत आहेत. त्यामुळे बीएसएनएलची 4 जी सेवा सुरू होणे आता धुसर बनले आहे.

गेल्या काही वर्षांपासून बीएसएनएल कंपनी मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. तोटा कमी करण्यासाठी बीएसएनएलने देशभरात कर्मचार्‍यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. आर्थिक फायदा मिळत असल्याने 80 टक्केपेक्षा जास्त कर्मचार्‍यांची स्वेच्छानिवृत्ती घेतली. केंद्र सरकारने निवृत्तीला मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात बीएसएनएलचे 224 कर्मचारी वेगवेगळ्या पदावर कार्यरत होते. बीएसएनएल सुमारे 3 लाख प्रीपेड व पोस्टपेड मोबाइलधारकांना सेवा देते. लॅण्डलाईनची संख्या 18 हजार आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. मात्र, बीएसएनएल आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे कर्मचार्‍यांचे अनेक महिन्यापासून नियमित पगार रखडत होते. त्यातच बीएसएनएलने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. त्याअंतर्गत मिळणारी भरपाईची रक्कम सेवा बजावलेल्या प्रत्येक वर्षासाठी 35 दिवसांचे वेतन आणि निवृत्ती बाकी असलेल्या प्रत्येक वर्षासाठी 25 दिवसांचे वेतन या सूत्राप्रमाणे दिली. याशिवाय निवृत्ती घेणार्‍या काही कर्मचार्‍यांना पेन्शनसुद्धा लागू होणार आहे. त्यामुळे या योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद देत 224 पैकी 162 जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यानंतर ही संख्या 125 वर आली आता फक्त 8 वर आली आहे.