रत्नागिरी:- तीस कोटींच्या खंडणीसाठी सुरतमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन रत्नागिरीतील एका बंगल्यात बंदिस्त करुन ठेवणार्या बिहारच्या कुख्यात चंदनसोनार टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या तावडीतून बांधकाम व्यावसायिकाची सुटका करण्यात आली आहे. खंडणी वसुलीसाठी वेळ मिळावा या उद्देशाने त्यांना रत्नागिरीत ठेवण्यात आले होते. ही कारवाई गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने केली आहे.
बांधकाम व्यावसायिक जीतू पटेल हे गुजरातमधील उमरगाम येथे वास्तव्याला आहेत. याच भागात त्यांचा मोठा व्यवसाय आहे. 22 मार्चला मित्रांची भेट घेऊन परतताना चंदनसोनार टोळीतील सात जणांनी त्यांच्या गाडीला धडक देवून गाडी थांबवली. तेथे त्यांचे अपहरण करण्यात आले.
जीतू सोनार यांच्या कुटुंबीयांकडे फोनवरुन तीस कोटींची मागणी केली. याची तक्रार नातेवाईकांनी केल्यानंतर उमरगाम पोलिसांसह एटीएस गुजरात, सुरत शहर पोलिस, गुन्हे शाखा आणि महाराष्ट्रातील मीरा भाइर्दर वलसाड पोलिस यांनी संयुक्तपणे टीम तयार करून आरोपींचा शोध घेतला. उमरगाम येथून जीतू पटेल यांचे अपहरण करून त्यांना प्रथम वलसाड येथे आणण्यात आले. तेथून खंडणीचा फोन केल्यानंतर काही अपहरणकर्त्यांनी पटेल यांना रत्नागिरीत हलविले. रत्नागिरीतील एका अलिशान बंगल्यात त्यांना बंद करून ठेवण्यात आले होते.
गुजरात, महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त पथकाने जीतू पटेल यांची रत्नागिरीतील एका बंगल्यातून सुटका केली. पप्पू चौधरी, दीपक उर्फ अरविंद यादव, अजमल हुसेन अन्सारी, अयाज, मोबीन उर्फ टकल्या, इशाक मुजावर, जिज्ञेशकुमार उर्फ बबलूकुमार यादव यांना रत्नागिरीतून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. गुजरात, महाराष्ट्र पोलिसांनी ही कारवाई करताना जिल्हा पोलिसांना बाजूला ठेवले होते. जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस ठाण्याला या कारवाईची माहिती देण्यात आली नव्हती.