बिबट्याची मजल थेट दुसऱ्या मजल्यावर

साखरप्यातील घटना सी सी टीव्ही कॅमेर्‍यात कैद

साखरपा:- साखरपा बाजरपेठेनजीक असणाऱ्या सोनार आळी येथे रजत भाटकर यांच्या घराच्या जिन्याने दुसऱ्या मजल्यावर बिबट्याने प्रवेश केल्याचे चित्रण सी सी टीव्ही फुटेजमधे कैद झाले आहे.
यामुळे त्यांच्यासह शेजारी राहणाऱ्या नागरिकांमध्ये व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मागील काही दिवसांपासून त्यांच्या जवळ असणाऱ्या पाळीव प्राण्याचा मागोवा घेत हा बिबट्या येथे येत असल्याचा अंदाज होता तो अखेर खरा ठरला. वनविभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

साखरपा परिसरात अनेक भागात बिबटे खुलेआम फिरत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. कालच्या फुटेज मुळे याला जोर मिळाला आहे. असा प्रकार होत राहिला तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
परिसरातील पाळीव प्राणी या बिबट्यांमुळे संकटात सापडले असताना आता बिबट्या थेट घरात शिरण्याचा प्रयत्न करु लागल्याने वनविभागाने हि घटना गांभीर्याने घेउन याबाबत हालचाल करावी अशी मागणी होत आहे. याबाबत भाटकर हे सुद्धा वनविभागाकडे तक्रार करणार आहेत.