बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

बचावासाठी केलेल्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचाही मृत्यू

चिपळूण:- कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. स्वतःच्या बचाव दरम्यान शेतकऱ्याने बिबट्याला धरून जमिनीवर आपटले आणि टोकदार भाल्याने त्याला जखमी केले. या झटापटी दरम्यान बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. चिपळूण तालुक्यातील मौजे वारेली येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.

याबाबत एका वृत्‍तवाहिनीने दिलेल्‍या माहितीनुसार, तोंडली – वारेली परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता. तोंडली – वारेली गावच्या सीमेवर आशिष शरद महाजन (वय ५५) या शेतकऱ्याचे घर आहे. या शेतकऱ्याकडे काही जनावरे आणि पाळीव कुत्रा आहे. शनिवारी रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान महाजन यांचा कुत्रा जोरजोराने भुंकत होता. तो का भुंकतोय हे पाहण्यासाठी महाजन घराच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना कुत्र्याच्या दिशेने येणारा बिबट्या दिसला.

महाजन यांनी कुत्र्याला बिबट्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर बिबट्याने महाजन यांच्यावरच हल्ला चढवला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत बिबट्याने महाजन यांच्या दोन्ही पाया, उजव्या हाताला, तोंडावर आणि डोक्यावर जखमा केल्या रक्तबंबाळ झालेल्या महाजन यांनी बिबट्याला पकडून जमिनीवर आपटले. दोघांमध्ये सुरू असलेल्या संघर्ष महाजन यांच्या पत्नी सुप्रिया यांनी पाहिला घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या सुप्रिया यांनी टोकदार भाला आणून महाजन यांना दिला.

महाजन यांनी प्रथम भाल्याने बिबट्याला मानेवर वार केले नंतर त्याच्या छातीत भाला घुसविला. या झटापटीमध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्‍यान, यानंतर परिसरातील ग्रामस्थ ही घटनास्थळी दाखल झाले. महाजन हे गंभीर जखमी झाल्याचे पाहिले. त्यांच्यावर वहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर डेरवण येथील रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.