रत्नागिरी:- “बा, समुद्रा शांत हो….” असे म्हणत मच्छीमार बांधवांसह रत्नागिरीकरांनी नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्राला नारळ अर्पण केला. मांडवी आणि भाट्ये किनारी समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी रत्नागिरीकरांनी हजेरी लावली.
मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वाचा असलेला नारळी पौर्णिमा हा सण कोकण किनारपट्टीवर ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. कोळी बांधवांचा सण म्हणून तो ओळखला जातो. जून आणि जुलै या दोन महिन्यांत मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला असतो. त्याला शांत करण्यासाठी नारळ अर्पण करून अनेक मच्छीमार मासेमारीला प्रारंभ करतात. सध्या ती औपचारीकता असली तरीही काही मच्छीमारांकडून ती परंपरा आजही पाळली जाते. कोरोनाच्या संकटानंतर यावर्षी निर्बंधमुक्त नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. पावसाने देखील उसंत घेतल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
प्रथेप्रमाणे पोलिसांतर्फे प्रतिवर्षी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. सायंकाळी वाजतगाजत हा नारळ अर्पण करण्यात आला. तसेच सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांनीही नारळ दिला. “समुद्राला शांत हो…” अशी साद घातली. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे किनार्यावर फिरण्यासाठी मोकळे वातावरण होते. पावसाने दिवसभर काहीशी विश्रांती घेतल्यामुळे रक्षबंधनासाठी भावा, बहीणींना बाहेर पडणे शक्य झाले होते.