बारा वाड्यांच्या भैरी बुवाचा शिमगोत्सव आजपासून

रत्नागिरी:- भावा-बहिणींच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरीकर आतूर झाले असून होळी पौर्णिमेला रात्री 12 वाजता रत्नागिरीचं ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या भैरीची पालखी ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडणार असून याच दरम्यान मिर्‍या येथील नवलाई-पावणाई पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगणार आहे. बारा वाड्यांच्या शिमगोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून पोलिसांनीदेखील चोख पोलीस बंदोबस्त या काळात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिमगोत्सव म्हटलं की, सार्‍यांच्याच तोंडून भैरीचं नाव येते. शिमगोत्सवात अनेक ग्रामदेवतेच्या पालख्या प्रदक्षिणेला बाहेर पडतात. रत्नागिरीत भावा-बहिणीच्या पालखी भेटीचा सोहळा ही एक परंपराच आहे. ही भेट पाहण्यासाठी हजारो भाविक भैरी मंदिराबाहेर मोठी गर्दी करतात. पालख्यांच्या भेटीनंतर होळी पौर्णिमेला रात्री बारा वाजता ग्रामदैवत कालभैरव तथा भैरी ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो… ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांच्या तुडुंब गर्दीने आवार फुलून जातो.. अशा भक्तिमय वातावरणात भैरीबुवा आणि त्याच्या मिर्‍या येथील दोन भगिनी नवलाई-पावणाईदेवीच्या पालख्यांची भेट होते… या भेटीने शिमगोत्सवाने हजारो भाविक आनंदून जातात. पालख्या भेटीचा हा सोहळा आपल्या डोळ्यांत साठवून ठेवत भैरीच्या चरणी हजार भाविक नतमस्तक होतात.

 रत्नागिरीतील शिमगोत्सवात खरा मान भैरीबुवाचा असतो. भैरीबुवाची अधिसत्ता काजरघाटीपर्यंतच्या बारा वाड्यांत आहे. त्यामुळे भैरीबुवाला भेटण्यासाठी आसपासच्या गावांतील ग्रामदेवता येतात. यामध्ये काजरघाटी येथील महालक्ष्मी, टेंभ्ये येथील भैरी-जुगाई यांचा समावेश आहे. पौर्णिमेला भैरीबुवा जोगेश्‍वरीची होळी आणण्यासाठी बाहेर पडतात. सडामिर्‍या येथील नवलादेवी-पावणादेवी व जाकीमिर्‍या येथील नवलाई, पावणाई या दोन्ही देवी भैरीबुवाच्या बहिणी. त्यामुळे या 2 पालख्या होळी तोडण्यासाठी जाताना भावाच्या भेटीला येतात. ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत या पालख्या भैरीच्या देवळात येतात. या शिमगोत्सवासाठी चाकरमानी अत्यंत भक्तिभावाने कोकणात दाखल होत असतात. 

रात्री बारा वाजता भैरीची मनोभावे प्रार्थना करून पालखी ग्रामप्रदक्षिणेला निघाते. तत्पूर्वी जाकिमिर्‍या आणि सडामिर्‍या येथील नवलाई-पावणाईदेवीच्या पालख्या भैरीच्या प्रांगणात हजर होतात. या दोन्ही पालख्या आळीपाळीने भैरीला भेटतात. पालख्यांची विधिवत पूजा केली जाते. हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण व हुरा रे हुरा आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा ऽऽ रे होलिओऽऽ, आलकी रे आलकी भैरीबुवाची सोन्याची पालखी… अशा फाकांनी आसमंत दुमदुमून जातो. पालखी भेटीचा हा सोहळा हजारो भाविक डोळ्यांत साठवून घेतात. ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडलेल्या पालखीचे ठिकठिकाणी जंगी स्वागत होतेे. गार्‍हाणे घालणे, उल्पा देणे असे कार्यक्रम पार पडल्यानंतर ही पालखी झाडगाव येथील सहाणेवर बसते.