3,392 हेक्टर क्षेत्र बाधित; गाळामुळे जमीनी बनल्या नापिक
रत्नागिरी:- जुलै महिन्यातील अतिवृष्टीमध्ये वाशिष्ठी, जगबुडी, भारजा, काजळी, बावनदी, अर्जुना नदी किनारी भागातील 3 हजार 392 हेक्टर शेतजमीनीचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार भरपाईपोटी सव्वा चार कोटीची गरज आहे. राज्य शासनाकडून घरे, दुकाने यासह अन्य नुकसानीसाठी तिप्पट भरपाई जाहीर केली आहे; मात्र भातशेतीवर अवलंबून असलेल्या शेतकर्यांसाठी अजुनही मदतीच्या नव्या निकषांची प्रतिक्षा आहे.
जिल्ह्यात 21 ते 23 जुलै या कालावधीत पडलेल्या अति मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला. नद्यांना आलेल्या पुराने भातशेतीची वाताहात झाली. नुकतीच भात लावणी पूर्ण झाल्यामुळे रोप जमिनीत घट्ट झालेली नव्हती. पाण्याच्या प्रचंड प्रवाहात शेती वाहून गेली. अनेक ठिकाणी जमीनही खरवडली गेली होती. काही ठिकाणी पुराबरोबर आलेला गाळ जमिनीतच साचून राहिला आहे. चिपळूणमधील तिवरे, तिवडे, दादर सारख्या भागात डोंगरातील माती खाली आल्यामुळे मुरम भातशेतीत येऊन बसला आहे. ती जमीन नापीक झाली आहे. तो गाळ बाजूला काढण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च लागणार आहे. भातशेती वाया गेल्यामुळे यंदाच्या वर्षी त्यांना उत्पादन मिळणार नसल्याने मोठी चिंता पडली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झालेले आहेत. यामध्ये शेती व फळपिकाचे 2 हजार 369.85 हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यात 2 हजार 179.56 भाताचा समावेश आहे. पुराच्या पाण्याने खरवडून गेलेले क्षेत्र 437 हेक्टर असून गाळ साचलेले भात क्षेत्र 586 हेक्टर आहे. एनडीआरएफच्या जुन्या निकषानुसार भात पिकाला हेक्टरी 6 हजार 800 हेक्टरी मिळतात. त्यानुसार 1 कोटी 90 लाख रुपये शासनाकडून मिळणे अपेक्षित आहेत. खरवडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 37 हजार 500 रुपये असून त्यापोटी 1 कोटी 64 लाख आणि गाळामुळे बाधित झालेल्या शेतीला हेक्टरी 12000 रुपयेप्रमाणे 72 लाख रुपये असे एकुण 4 कोटी 26 लाख रुपये अपेक्षित आहेत. शासनाने पुरग्रस्त भागातील बाधितांसाठी सानुग्रह अनुदान वाटप केले. घरे, दुकाने, गोठे यांच्या नुकसानीपोटी अधिकची मदत जाहीर केली; मात्र त्यात शेतीचा समावेश नाही. त्यामुळे शेतकर्यांना नव्या निकषांची प्रतिक्षाच आहे.