रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथील यश ट्रेडर्स् दुकान फोडून चोरी करणार्या चौघांना अवघ्या चोवीस तासात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेतले. त्यामध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांनी चोरलेली रक्कमही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
निर्मल रमेश ओसवाल (वय ३३ वर्षे व्यवसाय व्यापार, रा . ब्लॉक नंबर १, ओसवाल टॉवर, आठवडाबाजार, ता . जि . रत्नागिरी) यांच्या आठवडा बाजार येथील यश ट्रेडर्स् हे दुकान फोडून अज्ञातांनी ३२ हजार रुपये चोरुन नेले होते. हा प्रकार २३ ते २४ सप्टेंबर या कालावधीत घडला होता. याबाबत निर्मल ओसवाल यांनी शहर पोलीस ठाण्यात २४ सप्टेंबरला तक्रार दाखल केली होती. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी शहरातील सीसीटिव्ही फुटेजचा आधार घेऊन तपास सुरु केला. पोलिसांनी खबर्यांच्या मदतीने त्यांचा माग काढण्यास सुरवात केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने त्या चौघांची माहिती मिळाली. ही घरफोडी चार जणांनी केल्याचे निदर्शनास आले होते. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलली. चोरी करणारे गोव्यातील कळंगुट येथील असल्याची माहिती खबर्यांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील पथक त्यांना पकडण्यासाठी कळंगुट येथे गेले. कळंगुट पोलीसांच्या सहकार्याने चोरी करणार्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यात फिरोज इसरार आलम (वय ४८ वर्षे , रा . पिंपरखेडा जि . उन्नाव राज्य उत्तरप्रदेश), मोहम्मद सुफियान मोहम्मद अब्बास (वय २७ वर्षे रा . कानपूर राज्य उत्तरप्रदेश), मोहम्मद अझरुद्दीन मोहम्मद हनीफ (वय २२ वर्षे , रा . कासीमनगर , राज्य उत्तरप्रदेश) आणि एक अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे. चोरी केल्याचे त्यांनी कबुल केले असून चोरीला गेलेले ३२ हजार ५०० रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कामगिरी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्सटेबल प्रविण बर्गे, अमोल भोसले, पंकज पडेलकर, आशिष भालेकर, दिपराज पाटील, मंदार मोहिते यांच्या पथकाने फत्ते केली. या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार सुनील चवेकर करत आहेत. ही चोरी उघड केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती जयश्री देसाई, उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.