जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ९८६ घरगुती
तर ११६ सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना
रत्नागिरी:- कोकणातील सर्वात महत्वाचा समजला जाणार्या गणोशोत्सवाची जय्यत तयारी प्रत्येक घराघरात सुरु आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहे. शनिवारी प्रत्येक घरी बाप्पाचे वाजात गाजत आगमन होणार असून जिल्ह्यात१ लाख ६६ हजार ९८६ घरी तर ११६ सार्वजनिक मंडळांमार्फत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी प्रशासनासह पोलीस दलही सज्ज झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १ लाख ६६ हजार ९८६ घरगुती गणपती तर ११६ सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामधील ११ हजार ९८४ दीड दीवसांचे गणपती आहेत. घरच्या गणपती बाप्पासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून चाकरमानी गावी येतात.
प्रत्येक गावामध्ये कुठे घुंगरांचा आवाज तर कुठे तबल्याची साद ऐकू येते. अनेक ठिकाणी शक्तीवाले व तुरेवाले डबलबारी तर काही ठिकाणी भजनांचा आवाज ऐकू येतो. अनेक ठिकाणी सार्वजनिक आरत्याही कानावर येतात.
गुहागरमधील शृंगारतळीमध्ये शृंगारतळीचा राजा व निळकंठेश्वर सार्वजनिक गणपतीचे आयोजन केले जाते. गुहागर शहरामध्ये घरगुती गणपतीमध्ये मोठया मूर्त्यांची स्थापना केली जाते . अनेक ठिकाणी चलचित्र देखावे पाहावयास मिळतात. प्रतिवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे चलचित्र साकारले जाते. गुहागर पोलिस स्थानक, गुहागर महावितरण याही ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. रत्नागिरीमध्ये श्री रत्नागिरीचा राजा,रत्नागिरीचा राजा आठवडा बाजार , बंदर रोड मित्रमंडळ गणेशोत्सव, टिळक आळीतील सार्वजनिक गणेशोत्सव, शांतिनगरचा राजा,उद्यमनगरचा राजा, तसेच सार्वजनिक बांधकाम शासकीय रुग्णालय नगरपरिषद भूमिअभिलेख पाटबंधारे जिल्हा विशेष कारागृह अशा विविध कार्यालयांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो.