ओबीसी संघर्ष समितीचा इशारा
रत्नागिरी:- कोकणातील आंबाबागायतदार, शेतकर्यांचे अनेक वेळा वादळ, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल यामुळे अतोनात नुकसान होऊन सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त होऊन कर्जबाजारी झाले आहेत. सध्या बँका व वित्तीय संस्थाकडून शेतकर्यांची कायद्याचा दुरुपयोग करुन मुस्कटदाबी केली जात आहे. या अन्याया विरुध्द आवाज उठविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याकडे शासनाने गांभीर्याने न पाहिल्यास येत्या 24 ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा एकमुखी ठराव बागायतदार शेतकर्यांनी केला आहे.
रत्नागिरीत या बागायतदारांच्या प्रश्नी सविस्तर चर्चा व त्याबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी कोकण हापूस आंबा सहकारी संस्था मर्या. आणि ओबीसी संघर्ष समिती, रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी येथे शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुसळधार पाऊस पडत असतानासुध्दा रत्नागिरी, राजापुर, संगमेश्वर तालुक्यातुन मोठ्या संख्येने शेतकर्यांनी उपस्थिती दर्शवलेली होती.
मागील 15 ते 20 वर्षे कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू, इत्यादी पिकांवर आस्मानी संकटे आली आहेत. बागायती, शेतीवर अशाप्रकारे नैसर्गिक संकटे झेलत असताना बागायतदारांच्या प्रश्नांकडे शासन व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे फार मोठ्या समस्यांना बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे. मेळाव्याच्या सुरूवातीला प्रोजेक्टरच्या सहाय्याने कीटकनाशके व त्यांचा वापर, परिणाम, दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहीती खास कोल्हापूरहून आलेले पाटील यांनी उपस्थितांना दिली. या शेतकरी मेळाव्याचे औचित्य साधत प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी, तहसिलदार शशिकांत जाधव, निवडणूक नायब तहसिलदार कांबळे यांनी मोबाईलचा वापर करून ई -पिक पाणी अॅप वापरत असताना येणार्या अडचणींबाबत सर्व शेतकर्यांना मार्गदर्शन केले.उपस्थित शेतकर्यांच्या अनेक शंकांचे निरसन या
मेळाव्यात मार्गदर्शकांनी केले.
बागायतदार, शेतकर्यांनी अडचणींचा सामना करत असताना खचून न जाता आत्मविश्वास वाढविणे महत्वाचे असल्याचे देवगडहून आलेले प्रमुख मार्गदर्शक अॅड. प्रसाद करंदीकर यांनी केले. शेतकरी चळवळीत काम करीत असताना अन्यायाविरुध्द लढताना अनेक केसेस अंगावर घेतल्या. परंतु न्याय कसा मिळाला, हे उदाहरणादाखल त्यावेळी पटवून दिले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रकाश उर्फ बावा साळवी, नंदकुमार मोहीते, रघुविर शेलार, मंगेश साळवी यांनी संघटित होऊन संघटना मजबूत करणे का गरजेचे आहे? तसेच वेळ पडल्यास आपल्या हक्काची लढाई लढताना सहकार्य कसे आवश्यक असते या विषयी अतिशय पोटतिडकीने सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम लवकरच करु तेव्हा शेतकर्यांनी असाच सहभाग घ्यावा, असे आवाहन नंदकुमार मोहीते यांनी केले. या मेळाव्याला बहुसंख्य शेतकर्यांमध्ये दिनेश कदम, रविन्द्र मांडवकर, सचिन भातडे, शांताराम मालप, कौस्तुभ नागवेकर, शांताराम खापरे, रविंद्र सकपाळ, अरुण मावळंकर तसेच व्यासपिठावर प्रदीप सावंत, सुधीर वासावे, साक्षीताई रावणांग, राजु पावसकर, राजु पेडणेकर, मन्सुर काझी, मुस्ताफीर मुकादम, रघूनाथ डावल, सदाशिव पाचकुडे, राजु रामगडे, काशिनाथ तुळसणकर, विश्वनाथ खानविलकर हरिश्चंद्र घाटकर, सुधीर देसाई, शालीमार किर, अविनाश गुरव, दिवाकर कदम रविंद्र सपकाळ, चंद्रकांत तरळ, दत्ताराम वासावे, निलेश फुटक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.