बांधकाम क्षेत्रातील साहित्याला देखील महागाईची झळ

रत्नागिरी:-पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे तसेच वाढत्या महागाईमुळे शेतीमधील खर्चासह घरांच्या बांधकामाला लागणार्‍या खर्चातही वाढ झाली आहे. ट्रॅक्टर, जेसीबी आणि पोकलेन  त्याचबरोबर विंधन विहीर पाडण्यासाठी लागणारी यंत्र सामग्री, मैला उचलण्यासाठी लागणारे पंप आदी यांत्रिक साहित्याच्या भाडे दरातही वाढ झाली आहे.

शेतीबरोबर अनेक बांधकामाची कामे कमी मनुष्यबळात यांत्रिक पद्धतीने लवकर होत असल्याने यंत्राचा वापर करणे सुलभ झाले आहे. मात्र आता या यंत्रासाठी लागणार्‍या इंधनाच्या दरात वाढ झाल्याने त्यांच्या दरातही वाढ झाल्याने शेती खर्चासह बांधकाम खर्चही वाढला आहे. शेतीमध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे अनेक समस्या उभ्या राहत आहेत. त्यामुळे मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतामध्ये वेगवेगळ्या अवजारांचा वापर करून शेती केली  जाते.

तंत्रज्ञानाच्या  विकासामुळे  आज शेतीमधील कामे सहज आणि सोपी झाली आहेत. शिवाय काही क्षणातच ही कामे होत असल्यामुळे शेतकरी वर्ग निवांत झाला आहे. शेतीमध्ये नांगरणी,  पेरणी करण्यासाठी सुरवातीस बैलांचा वापर केला जायचा. परंतु आता ट्रॅक्टर आणि त्यासोबत असणारी विविध अवजारे यांचा वापर करून शेती केली जाते. ट्रॅक्टरमुळे शेतीमध्ये राबण्यासाठी मजूर आणि कष्ट कमी प्रमाणात लागते. मात्र या यंत्रासाठी इंधन लागते.
यासाठी अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप ही मागणी दुर्लक्षित आहे. मच्छिमारी व्यवसायाप्रमाणे डिझेल अनुदानाप्रमाणे शेतकर्‍यांनाही औजारांच्या इंधनासाठी अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र ही मागणी मागे पडल्याने अद्यापही खर्चिक स्वरुपात ही कामे शेतकर्‍यांना परवडत नसली तरी करावीच लागत
आहे.

काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत चालल्या आहेत. सध्या पेट्रोल 120 रुपये लिटर तर डिझेलने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरने शेती करणे खूपच अवघड झाले आहे. पूर्वी शेत नांगरण्यासाठी 300 ते 500 रुपये एकरी लागायचे. परंतु  तेच  आहे 1000 रुपये प्रति तास झाल्यामुळे शेतकरी वर्गाला फटका बसत
आहे.