रत्नागिरी:- गुजरात, कर्नाटक, केरळ, गोव्यापासून कोकणातील किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात बांगडा मासा मिळत आहे. निर्यातीच्या दर्जाचा मासा असला तरीही दर पडल्यामुळे मच्छीमारांची निराशा झाली आहे. बर्फ, डिझेलच्या वाढत्या दरामुळे नफ्याचे गणित कोलमडले आहे.
बंगालच्या उपसागरात काही दिवसांपुर्वी सितरंग वादळ घोगावत होते. ते पुढे सरकल्यामुळे त्याचा फार मोठा परिणाम जाणवलेला नाही. या वादळामुळे प्रवाहांबरोबर येणारा मासा कर्नाटककडून कोकणकिनारपट्टीकडे ढकलत पुढे येत आहे. मच्छीमारांना पंचवीस वावात बांगडा मासा जाळ्यात सापडत आहे. सातत्याने हा मासा मिळत असल्याने मागणीवर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी माल पडून आहे. मलेशिया, व्हिएतनामसारख्या देशांमध्ये बांगड्याला मोठी मागणी असते. कोकणातच नव्हे तर साऊथच्या अन्य देशांमध्येही बांगडाच सापडत असल्याने दरावर मोठा परिणाम झालेला आहे. निर्यातीला पुरक असा मासा मिळत असला तरीही किलोचा दर 30 ते 35 रुपये आहे. दर्जेदार माशाला 100 ते 120 रुपये किलोने दर मिळणे अपेक्षित असते. दर पडल्याने मच्छीमारांना फायदा मिळत नाही. सध्या मासेमारीला जाणार्यांना 50 ते 100 डिश (32 किलोची एक डिश) बांगडा मिळत आहे. एका फेरीमध्ये पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचा बांगडा सापडला तर त्यातून खर्च अधिक होत आहे. सध्या डिझेल, बर्फाचे दर वाढले असून त्यावर मोठा खर्च करावा लागतो. खलाशांचे पगार, नौकांची डागडुजी, जाळ्याची दुरुस्ती यावरही थोडाफार खर्च होतो. एका फेरीमधून दहा ते पंधरा टक्केच फायदा मिळत आहे. स्थानिक बाजारातही बांगड्याचा दर कमी असल्याने मच्छी विक्रेत्यांना त्यातून नफा मिळत नाही.