दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट व सी कोंच रिसॉर्ट बांधकाम पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण यांनी अखेर निविदा प्रसिद्ध केली आहे. हे रिसॉर्ट तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांचे असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी केला आहे.
या निविदेत म्हटले आहे की, दापोली तालुक्यातील मौजे मुरुड सर्वे नंबर 446 मधील साई रिसॉर्ट एनएक्स व सी कोंच रिसॉर्ट बांधकाम व इमारतीसाठी पुरवलेल्या सोयीसुविधा निष्कासन ( नष्ट ) करणे व त्या अनुषंगाने निर्माण होणारी संभाव्य मोडतोड व इतर सामग्री योग्यरितीने गोळा करून विल्हेवाट लावण्यासाठी वापरात येणाऱ्या साहित्यांचे मूल्यांकन करणे तसेच अस्तित्वात असलेल्या इमारती व इतर बाबी सविस्तर नकाशे 5 प्रति तयार करून त्याला सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेणे, यासाठी योग्य त्या सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी दरपत्रक मागवण्यात येत आहेत. ही दरपत्रके 12 ते 19 सप्टेंबर या कालावधीत मोहरबंद लखोट्यातून 22 सप्टेंबरपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील, असे म्हटले आहे. यामुळे आता लवकरच साई रिसॉर्टवर बांधकाम विभागाचा लवकरच हातोडा पडणार, हे निश्चित झाले आहे.