बसस्थानकासाठी जिल्हा नियोजनमधून १० कोटी

उदय सामंत ; रखडलेले बसस्थानकाचे काम लवकरच सुरू होणार

रत्नागिरी:-रत्नागिरीतील एसटी बसस्थानकाचा हायटेक प्रकल्प गेल्या अडिच तीन वर्षे रखडला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली असून आता विरोधकही या कामाबाबत आक्रमक झाले आहे. मात्र रखडलेला विषय सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याला उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दुजोरा दिला असून लवकरच ते काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा विषय चर्चेला आला होता. त्याला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी हे स्पष्ट केले. ठेकेदाराचे थकलेले ४० लाखाचे बिल रखडल्यामुळे सुरवातीला हे काम थांबले होते. मात्र मंत्री उदय सातंत यांनी प्रकल्पाला भेट देऊन ठेकेदाराला त्याबाबत सूचना केल्यानंतर हे काम सुरू झाले. मात्र या बांधकामाला कोरोनाचा फटका बसला. त्यानंतर रेंगाळलेल्या या कामाला अजुनही गती मिळालेली नाही. एसटीचा बंद सुरू असल्याने दुष्काळात तेरावा महिना, अशी परिस्थिती आहे.

ठप्प झालेल्या या कामाला गती देण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. २८ ला भाजपने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान याबाबत मंत्री उदय सामंत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत एसटी बसस्थानकाच्या थांबलेल्या कामाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. पालकमंत्री आणि परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्याशी चर्चा झाली असून १० कोटीच्या थांबलेले या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.