देवरुख:-संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे स्टॉप येथे भरधाव येणार्या लक्झरी बसने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, लक्झरीने दुचाकीस्वाराला फरफटत नेले. त्यातच मागील चाकाखाली सापडल्याने लक्झरीचे चाक अंगावून जावून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. रवींद्र शिवराम शिवगण (45, वांझोळे) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहिती नुसार, ‘माचाळची राणी भैरी भवानी ट्रॅव्हल्स’ (नंबर एमएच 04 जीपी 1299) ही मुंबईहून साखरप्याच्या दिशेने जात होती. तर वांझोळे गावातील रवींद्र शिवगण हा देवरुखला कामाला जाण्यासाठी दुचाकीवरुन निघाला होता. दरम्यान, रिक्षाला ओव्हरटेक करताना लक्झरी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार बसच्या मागील चाकाखाली येऊन चिरडला गेला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ट्रॅव्हल्स चालकावर देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.