चिपळूण:-दुचाकीला मागून बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सूरज मोरे असे मृत तरुणाचे नाव(२५, वैजी, ता. चिपळूण) आहे.
तालुक्यातील वैजी येथील रहिवासी व शहरातील साऊंड ऑफ म्युझिकमध्ये कामाला असलेला सूरज गुरुवारी काम आटोपून दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाला. मार्कंडी येथे रात्री साडेआठ वाजता त्याची दुचाकी अचानक बंद पडली आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या एका कंपनीच्या बसने त्याला धडक दिली. यामध्ये सूरज बसच्या मागील चाकाखाली सापडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या विचित्र अपघातानंतर येथे मोठी गर्दी झाली होती. त्यांचा मृतदेह रात्री कामथे रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी वैजी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सूरज मेकॅनिकल इंजिनिअर होता. तो गेली काही वर्षे साऊंड ऑफ म्युझिकमध्ये एसी, कुलर, फ्रीज दुरुस्तीची सेवा देत होता. सूरजच्या या अपघाती मृत्यूमुळे वैजी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे.