रत्नागिरी:- लैंगिक अत्याचार करणार्यावर गुन्हा दाखल होऊनदेखील संशयित बिनबोभाट गावात फिरून बदनामी करतोय तसेच धमकावण्याचे प्रकार सुरू झाल्याने पीडित महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणात ग्रामीण पोलीस स्थानकात संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा 4 मार्च रोजी दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील खाडीकिनारी असलेल्या एका गावात बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे. शेजारी राहणार्या महिलेचा हात धरून सुरुवातीला तिचा विनयभंग करण्यात आला होता. हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुझ्या मुलांना ठार मारून टाकीन अशी धमकी दिली होती. तसेच येथे माझ्याशिवाय कोणाचे पान हलत नाही, असे सांगून तुला इथे राहायचे असेल तर माझ्या बोलण्याप्रमाणे रहावे लागेल, असे सांगितले होते.
ही घटना 2014 साली पहिल्यांदा घडली होती. मुलांना ठार मारून टाकण्याची धमकी दिल्याने या धमकीला घाबरून पीडित महिलेने पोलीस स्थानकात तक्रार दिली नव्हती. हीच कमजोरी समजून त्याने छळ सुरू ठेवल्याची तक्रार महिलेने नोंदवली आहे.
या तक्रारीत पीडित महिलेने 2015 साली घडलेली हकिकत विषद केली असून 2015 मध्ये ती नवीन घरी रहायला गेली. याचदरम्यान यातील संशयित मुबिन ईस्माईल सोलकर हा अर्ध्या रात्री घराच्या मागच्या दारातून आतमध्ये शिरला होता.
घरात शिरलेल्या मुबिनने मला कपडे काढायला सांगितले. मात्र मी त्याला नकार दिल्यानंतर त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि त्याचवेळी त्याने माझ्यावर अतिप्रसंग केल्याची तक्रार त्या महिलेने ग्रामीण पोलीस स्थानकात केली आहे.
पीडित महिलेने आपल्या तक्रारीत अनेक घटना उघड केल्या आहेत. मुबिन याने त्याची पत्नी घरात नसताना माझ्यावर असेच अतिप्रसंग केले. तसेच दुधातून नशेची गोळी देऊन त्याने वारंवार असे प्रकार केल्याची तक्रार या पीडितेने केली आहे.
यातील संशयित मुबिन याच्या घरातील मंडळी झोपल्यानंतर तो घराच्या माळ्यावर यायचा व तेथून पीडित महिलेच्या घराच्या खिडकीवर दगड मारून तिला जागी करायचा. तसेच खिडकीत आल्यानंतर तिला निर्वस्त्र व्हायला सांगायचा, असेही या पीडितीने तक्रारीत नमूद केले आहे.
यातील संशयित मुबिन नामक व्यक्तीने पीडितेच्या मोबाईलवर वारंवार अश्लिल व्हिडीओ पाठवले असून ते व्हिडीओ पीडितेने डीलिट केले आहेत. तसेच शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर पीडितेच्या मुलांना तो मारहाण करत असे, अशी तक्रारदेखील त्या पीडितेने केली आहे.
3 मार्च रोजी रात्री 9.45 वा.च्या सुमारास पीडित महिलेची मुले घराबाहेर असल्याने त्यांना बोलावण्यासाठी ती घरातून बाहेर गेली. यावेळी संशयिताने पीडितेवर जबरदस्ती करून जबरी संभोग केला तसेच हा प्रकार कोणाला सांगितलास तर पती व मुलांना ठार मारीन अशी धमकी दिल्याने सततच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळलेल्या त्या पीडितेने ग्रामीण पोलीस स्थानक गाठले.
याप्रकरणी पीडित महिलेने मुबिन ईस्माईल सोलकर याच्याविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरोधात भा.दं.वि. कलम 376, 376(2)(एन), 354, 354-अ(2), 354बी, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.