रत्नागिरी:- बनावट सोन्याचे दागिने विकून रत्नागिरीकरांना गंडा घालण्याच्या तयारीत असलेल्या राजस्थान मधील पाच जणांच्या टोळीला शहर पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये दोन महिलांसह तीन पुरुषांचा समावेश असून त्यांच्याकडून सुमारे पाच किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे रत्नागिरीकर टोळीच्या फसवणुकीतून थोडक्यात वाचले आहेत. परंतु काही महिन्यांपूर्वी या टोळीने देवरुख मधील एका कुटुंबाची दहा लाखांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे.
राजस्थान मधील पाच ते सहा जणांची टोळी शहरानजीकच्या एका गावातील मोकळया जागेत वस्ती करून राहत होती. तेथून टोळीतील दोन महिला शहरात येऊन महिलांशी संपर्क साधत होत्या. कमी किमतीत सोन्याचे दागिने विक्रीच्या बाहण्याने या टोळीतील दोन महिला, महिलांशी संपर्क साधत फिरत होत्या. दोन दिवसांपूर्वी या टोळीतील एक महिला मारुती मंदिर येथील एका दुकानात असलेल्या महिलेला भेटून कमी किमतीत सोन्याचे दागिने घेणार का ?असे विचारले. मात्र आता पैसे नाहीत , नंतर या असे या महिलेने त्या टोळीतील महिलेला सांगितले. कमी किंमतीत सोन्याचे दागिने का विकतात? असा संशय त्या महिलेला आला. त्यांनी दोन दिवसांनी बोलवल्यानुसार शनिवारी दुपारी पुरुष सोन्याचे बनावट दागिने घेऊन मारुती मंदिर येथे आला. हा तरुण येणार असल्याची माहिती संबंधित महिलेने त्यापूर्वीच शहर पोलिसांना दिली होती. त्यामुळे शहर पोलीस मारुती मंदिर येथे सापळा लावून होते.
राजस्थानी तरुण बनावट दागिने घेऊन येताच शहर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्या खास स्टाईलने त्याची विचारपूस केल्यानंतर तो व टोळीतील अन्य दोन महिला व दोन पुरुष शहरातील विविध भागात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनतर पोलिसांनी पाचही जणांना तात्काळ ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस या पाच जणांची चौकशी करत होते. रात्री उशिरा टोळीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
गेले आठवडाभर राजस्थानी टोळी रत्नागिरीत वास्तव्याला आहे. त्यामुळे कमी किमतीत सोन्याचे दागिने विक्रीचे आमिष दाखवून टोळीने शहरासह ग्रामीण भागात कोणाची फसवणूक केली आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. परंतु पाच जणांची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडून सुमारे पाच किलो सोन्याचे बनाव दागिने पोलिसांनी जप्त केल्याचेही पुढे आले आहेत. तर तीन महिन्यापूर्वी देवरुख येथील एका कुटुंबाला या टोळीने तब्बल दहा लाखाचे बनावट दागिने विकले होते. अशी माहिती पुढे येत आहे. शहर पोलिसांनी वेळेत या टोळीला गजाआड केल्याने रत्नागिरीकरांची होणारी फसवणूक टळली आहे.