रत्नागिरी:- बनावट सोने खरे असल्याचे भासवून अनेकांना लाखोचा गंडा घालणारी मोठी टोळी राज्यासह कर्नाटकात सक्रिय आहे.या टोळीशी संबंधित 3 महिलासह 5 जणाना शहरात अटक करण्यात आली. काही लोकांशी ओळख काढवायची, आम्हाला खोदकाम करताना सोने मिळाले आहे, परंतु आमची परिस्थिती नाही, असे सांगुन खरे सोने पुढे करायचे, नंतर बनावट सोने देऊन फसवणुक करायची, अशी या टोळीची फसवणुक करण्याची पद्धत आहे. दहा लाखाची फसवणुक केल्याचे उघड झाले असून शहर पोलिसांनी पाच महिलांना अटक केली. पैकी २ महिलांना काल रात्री उशिरा अटक केले. या प्रकरणी आणखी काही संशय़ित पोलिसांच्या टप्प्यात आहेत.
गंगाराम बघेल, हरीभाई वाघडी, लक्ष्मणभाई लालजी भाई वाघेले, गिताबेन वाघेले आणि शांती चव्हाण (सर्व मूळ रा. अहमदाबाद, गुजरात सध्या रा. मिरजोळ पाडावेवाडी, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत एप्रिल २०२२ मध्ये देवरूख येथील महिलेची प्रथम या टोळक्याने फसवणूक केली होती. या महिलेच्या दुकानात यातील संशयितांनी सोन्याची माळ आणि चेन दाखवून ते कमी किंमतीत विकायचे असल्याचे सांगितले. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी सोन्याचे मणी तिच्याकडे तपासायला दिला होता. त्या महिलेने सोनाराकडे जाऊन तपासणी केल्यावर तो मणी खरा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संशयितांनी महिलेला व तिच्या पतीला १ किलो सोन्याचे दागिने १० लाख रुपयांत देण्यासाठी माळनाका येथील ब्रीजखाली बोलावून हा व्यवहार करण्यात आला होता. कालांतराने ते दागिने सोन्याचा मुलामा दिलेले असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला होता. हा गुन्हा नंतर देवरूख पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला; परंतु, फसवणूक रत्नागिरी येथे झाल्याने तो शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता.
तपास सुरू असताना शहर पोलिसांनी शहरातील सर्व सोनारांकडे याबाबत माहिती देऊन अशाप्रकारे कोणी सोन्याची तपासणी करण्यास आल्यावर पोलिसांना माहिती देण्याबाबत आवाहन केले. दरम्यान, गेल्या आठवड्यात खेडेकर ज्वेलर्समध्ये अशा प्रकारे काही महिला सोन्याची तपासणी करण्यासाठी आल्या असल्याची माहिती खेडेकर यांनी पोलिसांना दिली. खेडेकर आणि पोलिसांनी त्या महिलांना तुमची फसवणूक होण्याची शक्यता असून संशयित तुम्हाला व्यवहार करण्यासाठी जेव्हा बोलावतील तेव्हा आधी पोलिसांना याची माहिती देण्याबाबत सांगितले. त्यानुसार शनिवारी संशयित मारुती मंदिर येथे येणार असल्याचे त्यातील एका महिलेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून संशयित महिलांना अटक केली. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला असून, टोळीतील महिलांमार्फत महिलांना लक्ष्य करून सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फसवणूक केल्यानंतर ते आपल्या गावी जात असून प्रकरण शांत झाल्यावर ३ ते ४ महिन्यांनी पुन्हा फसवणुकीसाठी बाहेर पडतो, असे त्यांनी तपासात सांगितले. महाराष्ट्र राज्यातच नव्हे, तर कर्नाटकात ही टोळी सक्रिय आहे. या कारवाईनंतर टोळीतील आणखी काही पोलिसांच्या टप्प्यात आहेत.