रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील मिठगावणे येथील श्रमिक सहकारी पतसंस्थेत बनावट सोने ठेवत पतसंस्थेतची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पतसंस्थेच्या सोनारासह ८ जणांविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक ७ ऑगस्ट २०२३ ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत घडली आहे.
गणेश कृष्णा बेहरे, आकाश कृष्णा खडपे (दोन्ही रा. कुवेशी), संजय नागेश तिवरामकर (रा. पठारवाडी जानशी), ईशा योगेश सुर्वे, योगेश पांडुरंग सुर्वे (दोन्ही रा. तुळसुंदे), अमोल गणपती पोतदार, प्रभात गजानन नार्वेकर (दोन्ही रा. कोल्हापूर) आणि पतसंस्थेचा सोनार संतोष सदाशिव पाटणकर (रा. मिठगावणे, राजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात जगन्नाथ देवीदास रायकर (३२, रा. मिठगावणे, राजापूर) यांनी बुधवार, ५ जून रोजी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, यातील सात जणांनी आपल्याकडील ५३ तोळे ६५० मिलीग्रॅम बनावट सोने श्रमिक सहकार पतसंस्थेत कर्जासाठी ठेवले. तसेच पतसंस्थेच्या सोनाराने ते सोने खोटे आहे हे माहिती असूनही ते खरे असल्याची पावती पतपेढीला देऊन १७ लाख ८३ हजार ९०० रुपयांची फसवणूक केली.