बनावट मृत्यू दाखला प्रकरणी खरवते सरपंचांवर अपात्रतेची कारवाई

चिपळूण:- खरवते गावचे सरपंच ज्ञानदेव नारायण घाग यांच्यावर कोकण विभागीय आयुक्तांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. सरपंचपदाचा गैरवापर करून खोटा मृत्यू दाखला दिल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. सुनील राजाराम घाग (रा. वसई, पालघर) यांनी यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती.

खरवते (ता. चिपळूण) येथील विद्यमान सरपंच ज्ञानदेव नारायण घाग यांनी सुहास विष्णू महाडिक यांना त्यांचे भाऊ काशिनाथ विष्णू महाडिक हे अविवाहित तसेच मृत असून, त्यांचा मुलगा, मुलगी व पत्नी यापैकी कोणीही वारस नाही, असा दाखला ६ जानेवारी २०२२ ला दिला आहे. या दाखल्याच्या आधारे सुहास महाडिक यांनी काशिनाथ महाडिक यांचे नाव जमिनीच्या हिश्श्यातून कमी करून ते आपल्या नावे केली. सुहास महाडिक हा ज्ञानदेव घाग यांचा मेहुणा आहे. आपले हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांनी सरपंचपदाचा गैरवापर केल्यानंतर सुनील राजाराम घाग यांनी प्रथम गटविकास अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली. घाग यांनी १५ मार्च २०२४ ला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सरपंच ज्ञानदेव नारायण घाग यांनी दिलेल्या दाखल्याबाबत तक्रार केली. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेने गटविकास अधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागिवला. १९७० ते १९८५ या कालावधीतील मृत्यू नोंदवही १९९०चे जळितामध्ये नष्ट झाले आहे. त्यामुळे त्याची पडताळणी करता येत नाही. असे असताना खरवतेचे सरपंच ज्ञानदेव नारायण घाग यांनी दिलेला दाखला खोटा आहे, असे गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवले.

सुहास विष्णू महाडिक यांच्या मागणीनुसार, मी सदरचा दाखला दिल्याचे सरपंच ज्ञानदेव घाग यांनी बाजू मांडताना सांगितले होते; मात्र खरवते ग्रामपंचायतीच्या दस्तऐवजमध्ये महाडिक यांचे मागणीपत्र नाही. ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये वारसा दाखल्याचा समावेश नाही. वारसा दाखला देणे हे न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत असल्याने याप्रकरणी खरवते सरपंच यांनी इतर प्राधिकरणाच्या अधिकारात हस्तक्षेप करून कर्तव्यास कसूर केली आहे. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करणे हीच गंभीर शिक्षा होईल, अशी शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली होती.