रत्नागिरी:-कोरोनामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरावरुन शिक्षकांची नावे, मोबाईल नंबर, मेल आयडी, आधार क्रमांक यासह अन्य आवश्यक माहिती अपडेट करण्यात आली आहे. राज्यस्तरावरुन प्रक्रिया पूर्ण करणे शिल्लक आहे. यासाठी ३१ मे पर्यंतचा कालावधी आहे. दहा दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य असल्यामुळे बदल्यांबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठीच्या सॉफ्टवेअरची तांत्रिक चाचणी अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत ते कार्यान्वित होईल. बदल्यांचे निकष ठरवताना सर्वसाधारण कार्यक्षेत्रात दहा वर्षे आणि एकाच शाळेवर पाच वर्षे पूर्ण करणारे, अवघड क्षेत्रात तीन वर्षे सेवा करणार्या शिक्षकांना बदलीसाठी हक्क आहे. यासह संवर्ग एकमधील दुर्धर आजाराने पीडित शिक्षक, मतीमंद मुलांचे माता पिता, पती आणि पत्नी एकत्रिकरण या प्रकारात मोडणारे शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत. शिक्षकांच्या बदल्यांसाठी यूडायसनुसार शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे, शिक्षकांचे रोस्टर अद्ययावत करून त्यास विभागीय आयुक्तांची मंजुरी घेणे, अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करणे, शिक्षकांचे आधार अपडेट करणे, शिक्षकांचे समानीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांच्या नेमणुका करणे आदी विषयाचा समावेश होता. या सुचनानूसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व माहिती अद्ययावत करून बदली पात्र शिक्षकांची माहिती, रिक्त जागांचा तपशील, शिक्षकांची जन्म तारीख, आधार नंबर, पॅन नंबर, शालार्थ आयडीत तसेच शाळा बेस आणि शिक्षक बेस माहिती तयार करून ती ग्रामविकास विभागाला सादर केली आहे. दरवर्षी साधारणपणे ३१ मेच्या आत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. मात्र, दोन वर्षापासून कोविडच्या संसर्गामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. यंदा मात्र शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. शिक्षण विभागाने मागील १५ दिवसांपूर्वीच शिक्षकांच्या सेवाविषयक माहिती ग्रामविकास सादर केलेली आहे. या बदल्यांकडे आता शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.