बदलीसाठी चुकीची माहिती देणाऱ्या शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याची शक्यता

रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी चुकीची माहिती सादर करणार्‍या शिक्षकांची वेतनवाढ थांबविण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या पडताळणीमध्ये ९ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे पुढे आले असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या २०२२ मधील बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार बदलीसाठी पात्र असलेल्या विशेष संवर्ग १, विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करण्यासाठी निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षक आणि विशेष संवर्ग १ मधील शिक्षक यांना बदलीत प्राधान्य देण्यात येत आहे. अशा शिक्षकांनी त्यांचे अर्ज भरताना संपूर्णतः खरी व वस्तुस्थितीदर्शक माहिती भरून अर्ज करणे अपेक्षित आहे. खरी माहिती भरण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने अशा जबाबदार व्यक्तींकडून अर्ज भरताना जाणीवपूर्वक चुकीची व खोटी प्रमाणपत्रे, कागदपत्रे, माहिती सादर केली जाणे अपेक्षित नाही. तथापि काही शिक्षकांकडून संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतानाही जाणिवपूर्वक चुका केल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या संवर्ग १ आणि २ मधील शिक्षकांच्या प्रस्तावांची पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदस्तरावर शिक्षण विभागाकडून पडताळणीही करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात ९८९ शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यातील सवलती घेण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांची संख्या २०३ इतकी होती. त्यामध्ये नऊ शिक्षकांनी प्रस्ताव सादर करताना कागदपत्रे योग्य भरलेली नाहीत कर काहींनी चुकीची माहिती भरल्याचे आढळले आहे. त्यांचे प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. संबंधित शिक्षकांवर शासनाच्या आदेशानुसार एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई होऊ शकते असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. बदली राहीली बाजूलाच मात्र आता संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.