बदललेल्या वातावरणाचा हापूसवर परिणाम; कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती

रत्नागिरी:- संक्रांतीच्या दरम्यान वाहणारे मतलई वारे पाऊण महिने आधीच सुरू झाल्यानंतर एका दिवसात जिल्ह्यात सगळीकडेच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे थंडी गायब झाली असून, उष्मा वाढला आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम हापूस आंब्यावर होणार असून कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

यंदा मोहोर येण्याचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. मागील काही दिवस थंडीही सुरू झाली होती. ग्रामीण भागात वातावरण पोषक असतानाच मंगळवारी (ता. 19) दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम आंबा बागांवर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. उन्हामुळे झाडाच्या मुळांना ताण बसल्याने वेगाने मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली. दिवाळीनंतर थंडीही सुरू झाली. गतवर्षी उत्पादन कमी आल्याने जिल्ह्यातील बागायतदार अडचणीत आले होते. यंदा परिस्थिती उलटी आहे. मतलई वारे वाहू लागल्यानंतर थंडी वाढली तर पोषक स्थिती निर्माण होईल, असा बागायतदारांचा अंदाज होता; मात्र एका दिवसात वातावरण बदलले आणि बागायतदार धास्तावले. मंगळवारी पहाटे थंडीऐवजी उष्मा जाणवत होता. दिवसभर अशीच स्थिती राहिल्यामुळे मोहोरासह कैरीवर तुडतुडासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी औषध फवारणीचा पर्याय अवलंबावा लागणार आहे. त्याचा खर्च बागायतदारांना सोसावा लागणार आहे.