बदनामी टाळण्याच्या हेतुनेच त्याने काढला मैथिलीचा काटा

रत्नागिरी:-  शेळी चोरण्यावरुन झालेल्या वादातून व मैथिलीने धमकी दिल्याच्या रागातून निलेशने डोक्यात दगड घालून मैथिलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. मैथिलीने बळजबरी केल्याचा गावात बोभाटा झाला तर गावात आपली बदनामी होईल यातून निलेशने मैथिलीची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले आहे. निलेशला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे हत्येमागील अन्य कारणे चौकशीत पुढे येण्याची शक्यता आहे.

दि.९ ऑगस्टला मैथिली नेहमी प्रमाणे शेळ्या घेवून जंगलात गेली होती. शेळ्या चरायला सोडल्यानंतर ती मोबाईलवर होती. याच कालवधीत नजिकच्या पायवाटेने निलेश नागवेकर जात होता. त्यामुळे बांधाजवळ असलेली एक शेळ्या त्यांने लांबविण्याचा प्रयत्न केला. हि गोष्ट मैथिलीच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याला रोखले. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्या भागात जास्त वर्दळ नसल्याने दोघांच्या शिवाय त्या भागात कोणीही नव्हते. वाद घालून  निलेश निघून जात असताना मैथिलीने ‘तू शेळी लांबविलीस तर, तू माझ्यावर बळजबरी करत असल्याची बोंबाबोंब गावात करेन ‘ मग काही तुझे खरे नाही. अशी धमकी मैथिलीने दिली होती. त्यानंतर निलेश तेथून निघून गेला.

काहि अंतर गेल्यानंतर, मैथिलीने खरोखर गावात अशी बोंबाबोंब केली तर आपली गावात बदनामी होईल, घरात कौटुंबिक वाद सुरु आहेत. ते अधिकच वाढतील. असा विचार करुन निलेश परत आला. त्यावेळी पुन्हा त्यांची बाचाबाची झाली. यावेळी तेथेच असलेला दगड निलेशने मैथिलीच्या डोक्यात घातला. असे होईल अशी कल्पना नसलेली मैथिली दगडाच्या पहिल्याच फटक्यात जमिनीवर कोसळली. रक्ताच्या थारोळयात पडलेल्या मैथिलीवर त्याच दगडाने पुन्हा हल्ला करुन निलेश शांत डोक्याने तेथून निघून गेला होता.

निलेश व मैथिली यापुर्वी संपर्कात नसल्यामुळे निलेशवर कोणाचा संशय नव्हता. मैथिलीच्या संपर्कात असणार्या सर्वांची ग्रामीण पोलीसांनी चौकशी केली होती. तर याच कालावधीत निलेशच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध ग्रामीण पोलीसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यांचा कौटुंबिक वाद सुरु होता. अशा वेळी पूरावा नसल्याने खून  प्रकारणी निलेशची चौकशी झाली नव्हती. आपण सुटलो अशा भ्रमात असलेल्या निलेश अखेर पोलीसांच्या जाळयात अडकला.