बचत गटातील महिला बनणार चारचाकी चालक 

जि. प. अध्यक्ष रोहन बनेंचा अभिनव उपक्रम 

रत्नागिरी:-बचत गटाच्या चळवळीतून महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेने दीडशे बचत गटातील प्रत्येकी एक या प्रमाणे महिलांना चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष रोहन बने यांनी दिली.

अध्यक्ष बने यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष महेश नाटेकर, आरोग्य सभापती बाबू म्हाप, समाजकल्याण सभापती ॠतुजा जाधव, महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे झालेल्या चर्चेत प्रशिक्षण देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. पंधरा वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या
निधीतून यासाठी 15 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अनेक महिला बचत गटांमार्फत विविध व्यावसाय करत स्वयंपूर्ण बनलेल्या आहेत. भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, शेळीपालन, कोकणी मेवा, विविध प्रकारची पिठं, गांडुळ खत निर्मिती, भात व नाचणीची शेती या माध्यमातून महिलांना रोजगार मिळत आहे. तयार केलेली उत्पादनं बाजारपेठेपर्यंत पोचवण्यासाठी गाडी आणि चालकांची गरज भासते. काही महिला दुचाकी चालवतात; मात्र चारचाकी चालवणे शक्य होत नाही. त्यासाठी गावातीलच कुणावर तरी अवलंबून रहावे लागते. या महिला सर्वच गोष्टींनी स्वयंपूर्ण झाल्या पाहीजेत, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत गटातील प्रत्येक महिलांना चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दिडशे महिलांना प्रशिक्षण दिले जाईल, असे बने यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जावेत यासाठी अध्यक्ष बने यांच्याकडून पाठपुरावा सुरु आहे. उपलब्ध विकासनिधीतून जास्तीत जास्त कामे व्हावीत यादृष्टीने ते नियोजन करत आहेत. त्यासाठी अधिकचा निधी मिळावा यासाठी मंत्रालयीनस्तरावर प्रयत्न सुरु आहे.