बंद फ्लॅट फोडून चोरट्यांकडून ४ लाख ६० हजार रुपये लंपास

रत्नागिरी:- संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांचे थांबलेले उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत. रत्नागिरी शहरातील जोशी पाळंद येथील दीपक शहा यांचा बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ६० हजार रुपये लंपास केले आहेत. आज (रविवारी) उशिरा ही चोरीची घटना उघडकीस आली.

रत्नागिरी शहरातील सुभाष रोड वरील जोशी पाळंद येथे राहणारे दीपक शहा हे आपल्या कुटुंबीयांसमवेत दोन दिवसापूर्वी कोल्हापूर येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून रविवारी रात्री ते रत्नागिरी शहरात दाखल झाले. त्यावेळी त्यांना फ्लॅटचा कडी-कोयंडा तुटलेला असल्याचे लक्षात आले. त्यांनी आत जाऊन पाहिल्यानंतर कापटातील सुमारे ४ लाख ६० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.बेडरूममधील कपाटात पैसे असल्याच्या शक्यतेने चोरट्यांनी आजूबाजूच्या परिसरात चावीचा शोध घेतला. कपाटाची चावी बेडरूममध्ये असल्याने चोरट्यांनी चावीच्या सहाय्याने कपाट उघडून आतील रोकड घेऊन पोबारा केला.

रविवारी रात्री दीपक शहा हे कुटुंबासमवेत घरी परतल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर रात्री उशिरा उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते. उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी पंचनामा करत होते.चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी नव्याने बसवलेल्या कॅमेऱ्याची फूटेज तपासण्याचे काम सुरू केले होते. तर दीपक शहा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.