बंदुकीसह ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून दुचाकी, मोबाईलही जप्त

खेड:- तालुक्यातील कोंडिवली-निळीक मार्गावर ५० हजार रूपये किंमतीच्या काडतुसाच्या बंदुकीसह गजाआड केलेल्या शाहरूख सलाम डावरे (२१, रा. कोंडिवली-खेड) याच्यावर बुधवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून बंदुकीसह दुचाकी व ७५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा २ लाख रूपयांचा ऐवजही हस्तगत करण्यात आला.

तो एम.एच.०४/डी.एफ. १०४० क्रमांकाच्या दुचाकीवरून निळीक- कोंडिवली मार्गावर १२ बोअर सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक विक्रीसाठी घेवून जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. पथकात पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस शिपाई प्रकाश पवार, राहुल कोरे, सोहेल ढगे, चालक चिले यांचा समावेश होता. संशयित दुचाकीवरून निळ्या- पांढऱ्या कपड्यामध्ये काहीतरी गुंडाळून घेवून कोंडिवली येथून निळीक येथे जात असताना पथकाने थांबवले. त्याच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. झडती घेण्यात आली असता त्याच्याकडे काडतुसाची बंदूक व एक काडतूस आढळले. पोलिसांनी सारा ऐवज जप्त केला. ही बंदूक त्याने नेमकी आणली कुठून आणि तो कोणाला विक्रीसाठी घेवून जात होता, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या बाबतचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत. यापूर्वीही पोलिसांनी तालुक्यातील पोयनार-कोंडीवाडी येथून विनापरवाना ठासणीची बंदूक जप्त केली होती. पोलिसांच्या धडक कारवाईने विनापरवाना ठासणीची बंदूक वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.