बंदी आदेश मोडणाऱ्या ४ नौकांवर कारवाई

एन. व्ही. भादुले; पावसाचा जोर असल्याने उल्लंघनाचे प्रमाण नगण्य

रत्नागिरी:- बंदी कालावधीतील बेकायदेशीर मासेमारीला चांगलाच चाप बसला आहे. तरी मुसळधार पावसामध्ये धाडसी मात्र बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या ४ यांत्रिकी नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. 

गेल्या दीड महिन्यातील कारवाईमध्ये पर्ससीन नेट, मिनी पर्ससीन नेटचा समावेश आहे. या नौकांमधील मासळी जप्त करून तहसीलदारांकडे खटले दाखल केले आहेत. गेल्या वर्षी ५ नौकांवर कारवाई झाली होती.  पावसाळी मासेमारी बंदी सुरू होण्यापूर्वीच काही दिवस अगोदर सर्व मोठ्या नौका बंदरात आणून उभ्या केल्या जातात. तौक्ते चक्रीवादळाच्या इशार्‍यामुळे या वर्षी १५ मे पूर्वीच सर्व मोठ्या नौका बंदरांमध्ये नांगरून ठेवल्या होत्या. एकामागोमाग एक अशा बंदरात उभ्या असल्याने कोणत्याही नौकेला समुद्रात मासेमारी करण्यास जाण्यासाठी मार्ग नसतो. त्यामुळे मोठ्या मासेमारी नौकांकडून पावसाळी बंदीचे सहसा उल्लंघन होत नाही. या मोठ्या पर्ससीन, मिनी पर्ससीन नेट नौकांची मासेमारी १ सप्टेंबरपासून सुरू होते. पावसाळी बंदी काळात यांत्रिकी नौकांनाही मासेमारी करण्यासाठी समुद्रात जात येत नाही. तरीही मासेमारी करण्यास गेलेल्या एक-दोन सिलेंडरच्या ४ नौकांवर रत्नागिरीत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी दिली.

जिल्ह्यातील यांत्रिकी नौकांचे प्रमाण पाहिले तर ही कारवाई फारच किरकोळ आहे. जिल्ह्यात ३ हजार ५१९ इतक्या यांत्रिकी नौका आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ४४२ बिगर यांत्रिकी नौका असून या नौकांना पावसाळी बंदी काळात समुद्र किनार्‍यालगत मासेमारी करण्यास मुभा आहे. पर्ससीन मासेमारी वगळता इतर मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू होते. दरवर्षी जोरदार वारे, वादळ, मुसळधार पावसाचे हवामान खात्याचे इशारे असतात. यंदाही प्रचंड पाऊस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नौकामालक बंदी काळात नौका समुद्रात पाठवण्याचे धाडस करीत नाहीत. या बंदी काळात मासेमारी नौकांवर होणार्‍या कारवाईवर मर्यादा येतात.