रत्नागिरी:- तुमच्या बँक खात्याला आधारकार्ड लिंक झालेले नाही, अशी बतावणी करून अज्ञाताने प्रौढाकडून वेरिफिकेशन कोड घेऊन 45 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना शनिवार 12 जून रोजी सायंकाळी 5.30 ते सोमवार 14 जून रोजी सकाळी 6.56 वा. कालावधीत टिळकआळी येथे घडली.
याबाबत कैलास श्रीधर किनरे (40, रा.टिळकआळी, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताने त्यांच्या मोबाईलवर फोन करून तुमच्या बँक खात्याला आधारकार्ड लिंक झालेले नाही,असे सांगितले. त्यानंतर किनरे यांचा आधारकार्ड नंबर घेऊन तो लिंक झाल्यावर किनरे यांच्याकडून त्यांच्या मोबाईलवर आलेला वेरिफिकेशन कोड घेतला. त्यानंतर किनरे यांच्या बँक खात्यातून 44 हजार 995 रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेतले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किनरे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.