रत्नागिरी:- बँक कर्मचाऱ्यांचा आज शनिवारी (ता. १९) एक दिवसीय देशव्यापी संप होणार आहे. विविध बँकातून राबविण्यात येणाऱ्या आऊटसोर्सिंगच्या धोरणाविरोधात आणि सर्व बँकांतून त्वरित लिपिक भरती, शिपाई व सफाई कर्मचारी भरती चालू करावी या विविध मागण्यांसाठी बँकींग उद्योगातील अग्रणी संघटना ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (ए.आय. बी. ई. ए.) या संघटनेने देशव्यापी संप पुकारला आहे.
संपाच्या दिवशी रत्नागिरी शहरात शिवाजीनगर येथील बँक ऑफ इंडियाच्या झोनल ऑफिससमोर सकाळी १०.३० वाजता निदर्शने आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांनी निदर्शनांसाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, निदर्शने आणि संप पूर्णतः यशस्वी करावे, असे आवाहन संघटना प्रतिनिधी राजेंद्र गडवी व विनोद कदम यांनी केले आहे.
या संपावर तडजोड घडवून आणण्यासाठी मुख्य कामगार आयुक्त व आय. बी. ए. यांच्यासमवेत संघटना प्रतिनिधींची १० नोव्हेंबर रोजी बैठक बोलाविण्यात आली होती. परंतु बँकर्सचे कोणीही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मुख्य कामगार आयुक्तांनी यांनी या बैठकीत बँकर्सचे प्रतिनिधी व संघटना यांनी त्वरित बैठकीला बोलाविण्याचे निर्देश आय. बी. ए. ला दिले. त्यानुसार १६ नोव्हेंबरला आय.बी.ए., बँकर्सचे प्रतिनिधी व ए. आय. बी. ई. ए. संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक झाली. परंतु यात बँक व्यवस्थापनाकडून संघटनेच्या विविध मागण्यांबाबत कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे हा संप अटळ बनला. बँकर्सच्या नकारात्मक भूमिकेमुळे हा संप नाईलाजास्तव करावा लागत आहे, अशी स्पष्ट भूमिका ए. आय. बी. ई. ए. या संघटनेने व्यक्त केली आहे. या संपाला बँकींग उद्योगातील इतर सर्व संघटनांनी पाठींबा व्यक्त केला आहे.