तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, दापोलीतील घटना
दापोली:- दापोलीतील केळशी येथे एका 17 वर्षीय मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी अश्लिल वर्तन करणार्या तरुणाविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत आंबेकर (26, केळशी, दापोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अल्पवयीन पीडित तरुणीने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत याने कॉलेजमध्ये शिकणार्या एका अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मार्च 2021 मध्ये सायंकाळी 7 वा. च्या सुमारास स्कूलच्या आडोशाला नेवून अश्लील वर्तन केले. त्यानंतर 11 जुलै 2022 रोजी मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त काढून तिला फिरायला जाण्याचे सांगितले. मुलीने त्यास विरोध केल्याने संशयित निशांत याने तू माझ्यासोबत आली नाहीस तर तुझे फोटो व्हायरल करेन, तुला बदनाम करेन अशी धमकी दिली. त्यानंतर संशयिताने मुलीचे फोटो व्हॉटस्अप स्टेटस ठेवले. घाबरलेल्या मुलीने आपले फोटो व्हायरल होतील या भीतीने ही घटना घरच्यांपासून लपवून ठेवली. यानंतर निशांत हा तिला वारंवार त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून शेवटी मुलीचे आपल्या आई- वडिलांना ही गोष्ट सांगितली. आई-वडिलांनी लगेचच दापोली पोलीस स्थानक गाठले. 14 जुलै 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
मुलीने पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरुन निशांत याच्यावर पोक्सो अंतर्गंत 354 (अ), 1 (आय), 354 (ड), 506 नुसार लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.