फेसबुक पोस्टवरुन खंडाळ्यात सेना -भाजपामध्ये राडा

रिव्हॉल्व्हवर रोखत तरूणावर धारधार शस्त्राने वार; गुन्हा दाखल

रत्नागिरीः  फेसबुक पोस्टवरुन खंडाळ्यात शिवसेना -भाजपामध्ये जोरदार धुमःश्चक्री झाली आहे. फेसबुक पोस्ट केल्याच्या रागातून रिव्हॉल्व्हवर रोखत तरूणावर धारधार शस्त्राने वार केल्याने खंडाळा परिसरात खळबळ उडाली आहे. राजकीय पोस्टवरून दोन गटात राडा झाला. वार करणार्‍या दोघांसह दोन्ही गटातील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या राड्याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. भाजपा नेते विवेक सुर्वेसह शिवसेना विभाग प्रमुख योगेंद्र कल्याणकर आमने-सामने आले आहेत.

महेश मानसिंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी दुपारी ते आपल्या मित्रांसमवेत खंडाळा येथील गुरूकृपा हॉटेल येथे बसले होते. त्यावेळी योगराज विश्वास कल्याणकर, विभाग प्रमुख योगेंद्र विश्वास कल्याणकर यांच्यासह तीन अनोळखी महिला चार चाकी गाडीतून आल्या. फेसबुक पोस्ट केल्याच्या रागातून योगराज कल्याणकर याने आपल्या डाव्या हातावर चाकूने सपासप वार केले. तर योगेंद्र कल्याणकर याने डोक्याला रिव्हाल्वर लावत गळ्यातील सोन्याची चेन खेचली. तर तीन महिलांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी योगराज कल्याणकर, योगेंद्र कल्याणकर यांच्यासह तीन महिलांवर भादंविक 397, 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याच राड्याप्रकरणी सौ.शारदा विश्वास कल्याणकर (50 रा.वाटद) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खंडाळा नजिकच्या केदारी यांच्या हॉटेल समोर, आपला मुलगा योगेंद्र याने फेसबुक पोस्ट केली होती. त्यावरून भाजप नेते, माजी पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे, महेश मानसिंग पाटील यांनी फोनवरून शिवीगाळ केली होती. त्यावर आपल्या मुलाने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यावरूेन आपण हॉटेल केदारी येथे जेवणासाठी गेलो असता या दोघांनी तुला काल शिव्या घातल्या त्या कमी पडल्या का? मी जिंदाल कंपनी बॉम्बस्फोट करून उडवली. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला उडवायला वेळ लागणार नाही असे सांगत महेश पाटील याने गाडीची चावी काढून घेतली. त्याचा जाब विचारल्यावरून त्यांनी आपला मुलगा योगेंद्र याला मारहाण सुरू केली. यावेळी विवेक सुर्वे यांनी गळ्यातील मंगळसूत्र खेचून घेतले तर महेश पाटील याने आपल्या मुलाच्या गळ्यातील चेन ओढून शिवीगाळ केली. दोघांनी सुमारे 2 लाख 30 हजार रु.चे सात तोळयाचे मंगळसूत्र, दोन तोळे वजनाची सुमारे 60 हजार रु.ची सोन्याची चेन असा 2 लाख 90 हजार रु.चा ऐवज लांबविल्याचे सौ.शारदा कल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.