फाटक हायस्कुलची गिरीजा आंबर्डेकर ठरली शंभर नंबरी

रत्नागिरी:- वेळापत्रक बनवून नियमित अभ्यास करून तिने दहावीत चक्क 100 टक्के गुण मिळवले आहेत. होय या हुषार विद्यार्थिनीचे नाव आहे गिरीजा शैलेश आंबर्डेकर. येथील फाटक हायस्कूलमध्ये शिकणार्‍या गिरीजाने 491 गुण मिळवले व भरतनाट्यम या नृत्यकलेचे 9 गुण मिळवत तिने पैकीच्या पैकी म्हणजे 500 गुण मिळवले. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेकडून कौतुक करण्यात आले.

 परीक्षेपुरता अभ्यास न करता वर्षभर रोजचा अभ्यास आणि ठराविक नियोजन करून, वेळापत्रक बनवले होते असे गिरीजाने सांगितले. चौथी, आठवीमध्ये शिष्यवृत्ती मिळाली होती. शिवाय नृत्यगुरु मिताली भिडे यांच्याकडे भरतनाट्यमचे क्लासही सुरू होते. 100 टक्के मिळतील, असे वाटले नव्हते. परंतु या गुणांनी खूप आनंद झाला. शाळेतील शिक्षक, आई-वडील, आजी-आजोबांचे मार्गदर्शन मिळाले. आता विज्ञान शाखेतून पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार आहे.

फाटक हायस्कूलमधून 270 विद्यार्थ्यांपैकी 266 उत्तीर्ण झाले. शाळेचा एकूण निकाल 98.51 टक्के लागला. यामध्ये शाळेत गिरीजाने प्रथम क्रमांक पटकावला. त्या पाठोपाठ रुची भाटकर (99.20), अथर्व शेंडे (98.60), हर्ष मुळे (98.40), पार्थ गुरव (98.20), अभिषेक तांबे (98.20) यांनी सुयश संपादन केले. शाळेतील 64 विद्यार्थ्यांनी 89 टक्क्यांच्या पुढे गुण मिळवले आहेत. याबद्दल दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष सुमिता भावे, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर आणि मुख्याध्यापक किशोर लेले, सर्व पदाधिकार्‍यांनी कौतुक केले.