रत्नागिरी:- शहरानजीक फणसोप शाळेच्या अगोदर जुनी आईस फॅक्टरी रस्त्यावर दुचाकीला चारचाकी टेम्पो (छोटा हत्ती)ने धडक दिली. या अपघातात स्वार जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सोडून पलायन करणाऱ्या अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शार्दूल मंगेश भाटकर (वय २४, रा. पावस भाटीवाडी, रत्नागिरी) असे जखमी स्वाराचे नाव आहे. ही घटना २० डिसेंबर २०२४ ला फणसोप शाळेच्या अगोदर जुनी आईस फॅक्टरी येथील रस्त्यावर घडली. शुक्रवारी (ता. १४) मार्च २०२५ ला पोलिसांनी या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी शार्दूल भाटकर हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एजे ४८८८) घेऊन पावस ते रत्नागिरी असे जात असताना फणसोप शाळेच्या अगोदर जुन्या आईस फॅक्टरी रस्त्यावर मागून येणारा टेम्पो (छोटा हत्ती)ने जोरदार धडक दिली. या अपघातात स्वार भाटकर जखमी झाले. जखमी अवस्थेत व अपघाताची माहिती न देताच टेम्पो चालकाने पलायन केले. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण बेंदरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.