रत्नागिरी:- पैशाच्या वादातून प्रेयसीच्या पोटात सुरा भोसकून तिचा खून केल्याप्रकरणी अपंग असलेल्या संतोष बबन सावंत याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना १० जानेवारी २०१९ रोजी हातखंबा तारवेवाडी येथे घडली होती.
तालुक्यातील हातखंबा-तारवेवाडी येथे संतोष सावंत व पत्नी सोनाली सावंत हे दांपत्य दोन ते अडीच वर्षापासून भाड्याच्या घरात राहत होते. संतोष हा ट्रक चालक म्हणून काम करत होता तर पत्नी एका हॉटेलमध्ये कामाला होती. सुखी संसार चालू असताना संतोषची ओळख ज्योती उर्फ शमिका पिलणकर हिच्याशी झाली होती.
शमिका हिच्याशी ओळख सुरू झाल्यानंतर संतोष ज्या ठिकाणी भाड्याच्या खोलीत रहात होता त्या ठिकाणी शमिका हिची ये-जा सुरू झाली होती. तिचे रोजचे येणे-जाणे अनेकांनी पाहिले होते. त्यांची मैत्री दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेली.
संतोष हा ट्रक ड्रायव्हर होता. त्याची शमिकासोबत ओळख त्याच्या एका मित्राने करून दिली होती. शमिका ही मूळची मंगळवेढा, सोलापूर येथील राहणारी होती. मात्र ती मूळ गाव सोडून रत्नागिरीत आली होती. सुरूवातीला एका आश्रमात तिने आश्रय घेतला होता. त्यानंतर तिने फणसोप टाकळेवाडी येथील एका व्यक्तीशी विवाह केला होता.
संतोष याच्याशी ओळख झाल्यानंतर शमिकाचे त्याच्या घरी रोजचे येणे-जाणे सुरू झाले होते. ही मैत्री इतकी घट्ट झाली होती की त्या दोघांमध्ये अनेकवेळा अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते आणि त्याचे फोटो शमिका हिने काढून ठेवले होते.
शमिका हिने जे फोटो काढून ठेवले होते त्या फोटोची भीती दाखवून वारंवार संतोष याला ब्लॅकमेल करीत होती. कधी पाच हजार तर कधी दोन हजार अशी पैशाची मागणी ती करू लागली. या प्रकारामुळे संतोष हा हतबल झाला होता आणि त्यातूनच हा प्रकार घडला होता.
घटनेपूर्वी शमिका संतोष याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. यावेळी रावणंग नामक रिक्षा चालकाला फोन करून चार वडापाव, भजी प्लेट व २ एक्स्ट्रा पाव अशी ऑर्डर केली होती. साक्षीदार विलास रावणंग हा दिलेली ऑर्डर देण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता. यावेळी त्याने दोघांना एकत्र कॉटवर पाहिले होते.
पोटाची भूक भागवण्यासाठी वडा-पाव, भजी मागविली असताना शमिका व संतोष यांच्यात पैशावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या संतोष याने शमिका हिच्या पोटात सुरा भोसकून तिचा निघृण खून केला. या प्रकारानंतर संतोष याने साक्षीदार सुहास नितोरे यांना फोन करून सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास पत्नी काम करीत असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी बोलावून घेतले.
शमिका हिचा खून केल्यानंतर संतोष हा रिक्षा घेऊन पत्नी काम करीत असलेल्या हॉटेलवर आला. त्या ठिकाणी घडला प्रकार त्याने आपल्या पत्नीला सांगितला. थोडावेळ बोलणे झाल्यानंतर ते दोघेही घराकडे निघून गेले होते.
पत्नी घरी आल्यानंतर तिने सारा प्रकार पाहिला आणि तिचे हातपाय लटालटा कापू लागले. तिने तात्काळ या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली होती. या माहितीवरून तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पो. नि. सुरेश कदम, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस कर्मचारी श्री. चावरे, सुनील गायकवाड, अमित कदम, उमेश गायकवाड, प्रवीण पाटील, श्री. जाधव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी संतोष बबन सावंत याच्याविरोधात भादंविक ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तसे दोषारोपपत्र येथील न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावर अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने संतोष याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी म्हणून एएसआय सुनील आयरे यांनी मदत केली.