हलचल वहीत नोंद; 4 वेळा बायोमेट्रिक हजेरीही
रत्नागिरी:– रत्नागिरी पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कडक बंधने आली आहेत. पालिकेतील हलचल वहीने कर्मचाऱ्यांच्या अनावश्यक हालचालींना चाप घातला आहे. कोणालाही बाहेर जायचे असले तर जाण्याची वेळ आणि कारण आणि आल्याच्या वेळेची नोंद करायची आहे. बायोमेट्रिकवर एकदा नव्हे तर सकाळी आल्यावर, दुपारी लंचटाइम आणि संध्याकाळी जाताना, असा चारवेळा थंब लावायचा आहे. यामुळे पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशासकांनी चांगलीच शिस्त लावली आहे. या हलचल वहीची चांगलीच कुजबुज सुरू आहे.
पंचवार्षिक मुदत संपल्याने रत्नागिरी पालिकेवर २७ डिसेंबरला प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर हेच प्रशासक आहेत. पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कामाचा निपटारा करण्यातही काहीशी ढिलाई होताना दिसत होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याच्यादृष्टीने प्रशासक बाबर यांनी कडक पावले उचलली. कोरोनामुळे बायोमेट्रिकला काहीसा विरोध होता; मात्र त्यावरही सॅनिटायझरचा जास्त वापराचा पर्याय काढून त्यांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांना चारवेळा थंब लावणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी सकाळी कामावर हजर होताना आणि संध्याकाळी ड्यूटी संपल्यानंतर थंब केला जात होता. त्यामुळे मधल्या वेळेत कोण कुठे गेले, कोण कधी आले, याचा काही ताळमेळ नव्हता.
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या या सर्व अनावश्यक हालचालींवर प्रशासकीय कारभाराने चांगलाच चाप लावला आहे. बाबर यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामावर आल्यानंतर दुपारी लंचटाईम आणि परत आल्यानंतर तसेच संध्याकाळी ड्यूटी संपल्यानंतर असे ४ वेळा थंब करणे बंधनकारक केले आहे. एवढेच नाही, तर प्रत्येक विभागामध्ये एक हलचल वही ठेवली आहे. त्यामध्ये टेबल सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्याने या हलचल वहीमध्ये आपले नाव, जाण्याचे कारण, वेळ आणि परत आल्याची वेळ अशी नोंद करायची आहे. प्रत्येक टेबलवरील अधिकारी, कर्मचारी आपले काम उरकण्याच्या मागे व्यस्त असल्याने कामाचा निपटाराही वाढला आहे. प्रशासकीय राजवटीने पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलीच शिस्त लावली आहे.
पालिकेच्या प्रशासनाला शिस्त असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने हलचल वही आणि चारवेळा थंब अनिवार्य केले आहे. हा प्रशासकीय कामाचा एक भाग आहे.
-तुषार बाबर, मुख्याधिकारी रत्नागिरी पालिका