रत्नागिरी:- विविध सतरा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कामगार संघटनेच्यावतीने महावितरण कार्यालयाच्या बाहेर निदर्शने केली. …अरे असे कसे देत नाही? घेतल्याशिवाय जात नाही, अशा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केली.
कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत सामावून घ्या, तसेच महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार आदी मागण्यांसाठी राज्यभर आज कंत्राटी वीज कर्मचार्यांनी आंदोलन केले. या तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगार हे अनुभवी व कुशल आहेत. १५ ते २० वर्षांपासून ते काम करत आहेत. या कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या अनेक संघटनांनी शासन दरबारी मांडल्या. मात्र या कामगारांना अद्याप न्याय मिळाला नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली. या समितीने आपल्या १७ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. तिन्ही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आजरोजी मिळत असलेल्या एकूण पगारात बेसिक + पूरक भत्ता १ एप्रिल २०२३ पासून ३० टक्के वेतनवाढ मिळावी, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, तिन्ही वीज कंपनीतील मंजूर नियमित रिक्त पदांवर व गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामात समान वेतन मिळावे, कंत्राटी कामगाराच्या अपघाती मृत्यूनंतर वारसांना दिली जाणारी आर्थिक मदत वाढवून १५ लाख रुपये मिळावी, अशा अनेक मागण्या कंत्राटी कामगारांनी केल्या आहेत. आज सकाळपासून कंत्राटी कामगार धरणे आंदोलनाला बसले होते. यावेळी आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेत आम्हाला न्याय द्या, अशी मागणी लावून धरली. यावेळी कंत्राटी वीज कर्मचार्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.