रत्नागिरी:- माजी आमदार प्रमोद जठार यांच्या विरोधात आमदार राजन साळवी यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना ना. नारायण राणे यांच्याशी केल्याने आमदार राजन साळवी यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार अर्ज देत कारवाईची मागणी केली आहे.
शिवसेना आणि बीजेपी यांच्यामधील वाद आता दिवसेंदिवस टोकाला पोहचताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यावर आता दोन्ही बाजूंकडून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तक्रारी दाखल होत आहेत. लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी देखील अशीच एक तक्रार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माजी आमदार प्रमोद जठार यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी केली आहे. नारायण राणे हे फौजदारी केसमध्ये संशयित आरोपी आहेत. त्यांची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करणे हे निंदनीय कृत्य आहे. प्रमोद जठार यांनी २४ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले असे वक्तव्य केलेले आहे. नारायण राणे हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ठाकरे सरकार हे औरंगजेबाचे राज्य आहे असा प्रमोद जठार यांच्या वक्तव्याचा हेतू आहे. अशा प्रकारे तुलना केल्याने तक्रारदार यांचे असंख्य अनुयायी व शिवसैनिक यांच्या भावना दुखावल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच जठार यांचे हे वक्तव्य चिथावणीखोर असून यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. यामुळे प्रमोद जठार यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी आ. राजन साळवी यांनी या तक्रारीद्वारे केली आहे.