प्रधानमंत्री मातृवंदना विशेष सप्ताहात सापडले 950 नवे लाभार्थी

रत्नागिरी:- प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत आयोजित सप्ताहामध्ये ९५० नवीन पात्र लाभार्थींची नोंद करण्यात आली. त्यांच्या बँक खात्यामध्ये १६ लाख १४ हजार रुपये एवढी रक्कम लाभापोटी वर्ग केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.

जिल्ह्यात जानेवारी २०१७ ते मार्च २०२२ पर्यंत २९ हजार ६०६ लाभार्थींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आतापर्यंत २७ हजार २६९ लाभार्थी नोंदणी पूर्ण करून ९२.११ टक्के उद्दीष्ट साध्य केले. २७ हजार २६९ लाभार्थ्यांच्या खात्यावर ११ कोटी ४३ लाख २८ हजार रुपये वर्ग केले. उर्वरित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी १ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत मातृ वंदना सप्ताह राबविण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व शहरी भागात नागरी प्राथमिक केंद्रस्तरावर आरोग्य सेवक आरोग्य सेविका, आशा व गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत प्रभात फेरीद्वारे जनजागरण करण्यात आले. गरोदर स्त्रिया व स्तनदा माता विशेष आरोग्य तपासणी शिबीर लसीकरण सत्र, नवीन खाते उघडण्यासाठी शिबिरे, पोषण आहारासंदर्भात कार्यक्रम घेतले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सात दिवसात साडेनऊशे नवीन मातांची नोंदणी झाली. त्यात सर्वाधिक 208 मातांची चिपळूण तालुक्यात तर त्या खालोखाल रत्नागिरीत १२५ आणि संगमेश्वर तालुक्यात ११४ नोंदणी झाली. चांगले काम केल्याबद्दल या तिन्ही तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती ज्योती यादव, डॉ. महेंद्र गावडे आणि डॉ. श्रीमती शेरॉन सोनवणे यांना प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहात विशेष कामाबद्दल पुरस्कृत करण्यात येणार आहे. सप्ताहातील नोंदणीत ग्रामीण भागात ८२४ मातांची नोंदणी झाली असून १४ लाख ४६ हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले. तसेच पाच नगरपालिका क्षेत्रात १२६ मातांना २ लाख २८ हजार रुपये वर्ग झाले आहेत. ही योजना पुढे सुरु राहणार असून पात्र मातांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . अनिरुध्द आठल्ये यांनी आवाहन केले आहे.