रत्नागिरी:- भाजपच्या मिशन 400प्लस अंतर्गत ‘महाविजय 2024’ अभियान राबवले जात असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे 8 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी दौर्यावर येत आहेत. यानिमित्ताने ते तीन विधानसभा मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. याचवेळी ते रत्नागिरीे घर घर चलो अभियान अंतर्गत नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
जनसंघ व भाजपचा रत्नागिरी लोकसभा मतदार संघ हा हक्काचा मतदार संघ होता. त्यानंतर तो काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यात गेला. आजही हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाजपच्या मिशन 400 प्लस अंतर्गत पुन्हा एकदा या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघावर कमळ फुलवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघानुसार पक्षाने आक्रमक पदाधिकार्यांवर जबाबदारी टाकली आहे.
महाराष्ट्रात 45 जागा निवडून आणण्याचे ÷उद्दिष्ठ भाजपाने ठेवले असून, त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघातील पदाधिकार्यांशी संवाद साधण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे रविवार 8 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत येत आहेत. यावेळी जयेश मंगल पार्क या ठिकाणी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला रत्नागिरी-संगमेश्वर, चिपळूण-संगमेश्वर आणि साखरपा-लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघातील प्रमुख साडेचारशे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघातून दिडशे कार्यकर्त्यांची टिम निवडण्यात आली आहे.
लोकसभा मतदार संघाचे प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी यासाठी रत्नागिरी व सिंधुदुगंमधील सहा विधानसभा मतदार संघात बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात बैठका यासाठी पार पडल्या आहेत. रत्नागिरीतही नुकतीच बैठक झाली. यावेळी लोकसभा प्रभारी प्रमोद जठार, रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे प्रभारी माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष दादा दळी व विवेक सुर्वे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ते घर-घर चलो अभियानअंतर्गत रत्नागिरीतील काही घरांमध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा करणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विकास कामांबाबत आढावा घेणार आहेत.
भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय मार्गदर्शन करणार याकडे भाजपा कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.